सावंत कुटुंबीयांनी थरारनाटय़ अनुभवले
रविवारी संध्याकाळी गिरगाव चौपाटीवरील ‘महाराष्ट्र रजनी’च्या मंचाला आग लागली आणि मंचामागील कलाकारांची पळापळ सुरू झाली. एकामागून एक कलाकार बाहेर पडत होते. मात्र आपली मुलगी पूजा कुठेच दिसत नव्हती. पूजा कुठे गेली हे पाहण्यासाठी तिच्या वडिलांनी जळत्या मंचाकडे धाव घेतली.. इकडे आपले वडील कुठेच दिसत नसल्यामुळे पूजाचा आरडा-ओरडा सुरू झाला. काही वेळाने पूजा व तिचे वडील एकमेकांना समोर सुखरूप दिसल्यावर या पिता-पुत्रीने एकमेकांना घट्ट मिठी मारत आपल्या अश्रूंना वाट करून दिली. अवघ्या पाच मिनिटांच्या या थरारात प्रेक्षकांमध्ये असलेली पूजाची आई अमृता सावंत यांना मंचावर असलेली मुलगी आणि मंचामागे असलेले आपले पती यांची काळजी वाटू लागली आणि त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. मेक इन इंडिया सप्ताहातील महाराष्ट्र रजनी कार्यक्रमादरम्यान लावणी सादर करताना लागलेल्या आगीनंतर सावंत कुटुंबीयांनी हे थरारनाटय़ अनुभवले.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहातील प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून गिरगाव चौपाटीवर होणारा ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रम रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुरू झाला होता. यातील सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेत्री पूजा सावंत ही ‘वाजले की बारा’ या गीतावर लावणी सादर करत होती. मात्र मंचाखाली अचानक आग लागल्याने मंच पेटण्यास सुरुवात झाली. याबाबत पूजा म्हणाली की, मंचाला खालून आग लागली हे मला पाच मिनिटे कळलेच नव्हते. आग लागली असूनही आम्ही लावणी करत होतो. काळा धूर दिसल्यावर व समोरील लोक ओरडायला लागल्यावर मी मागे धावत गेले. तोपर्यंत आग भडकली होती. आम्ही सगळेच धावत मागे चौपाटीवर सुरक्षित स्थळी गेलो. मंचाच्यामागे अन्य कलावंतांनी देखील पळण्यास सुरुवात केली होती. माझ्या लावणीनंतर राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम होणार होता. यात माझे वडील विलास सावंत अफझल खानाची भूमिका करणार होते. मात्र ते तिथे सापडलेच नाहीत. ते थेट मला शोधण्यासाठी मंचावर गेले होते, हे मला नंतर कळले.
पुढे काहीशी भावूक झालेली पूजा म्हणाली, माझे वडील आणि माझे अत्यंत हळवे संबंध आहेत. त्यामुळे ते मला शोधायला जळत्या आगीत मंचावर गेले. पण तिथे मी न दिसल्याने त्यांची भीतीने गाळण उडाली होती. त्यांनी आग विझवण्याचे दोन सिलेंडर उघडण्याचा प्रयत्न केला. आमची समोरा-समोर भेट झाली आणि त्यांना मिठी मारून मी ओक्साबोक्शी रडत होते. याचा धक्का मात्र माझ्या आईला बसला असून तिला कमी रक्तदाबाचा त्रास उद्भवला आहे. हा माझ्या आयुष्यातील खूप भयावह प्रसंग होता.

Story img Loader