अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याचं मुंबई पोलिसांच्या लक्षात आलं होतं. त्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. आज राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
#UPDATE | Mumbai: Actress Shilpa Shetty’s husband & businessman Raj Kundra and one Ryan Tharp sent to Police Custody till 23rd July.
— ANI (@ANI) July 20, 2021
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलीस मढ परिसरातील त्या बंगल्यातल्या पॉर्न फिल्म प्रकरणाविषयी तपास करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उधळून लावला होता. यावेळी एका मॉडेलची सुटका करण्यात आली होती. ही मॉडेल मुंबईत बॉलिवुडमध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आली असताना पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अडकल्याची माहिती नंतर समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणामध्ये राज कुंद्रा मुख्य आरोपी आहे. राज कुंद्राच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्याच आधारावर पोलिसांनी आज सकाळी रायन थार्प या व्यक्तीला अटक केली आहे. रायन थार्प देखील राज कुंद्राशी थेट संबंधित असून पॉर्न फिल्म निर्मितीमध्ये त्याचाही सहभाग असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे.
Porn Case : मढ बीचवरील ‘तो’ बंगला ते पॉर्न फिल्म्स : राज कुंद्रा असा अडकला जाळ्यात
व्हिडीओ, ऑडिओ आणि इतर स्वरूपात अश्लीलतेचा आणि लैगिंक शोषणाचा प्रसार करणारं साहित्य तयार करणं वा इतरांना पाठवणं पोर्नोग्राफी प्रतिबंध कायद्याने गुन्हा आहे. अश्लील व्हिडीओ बनवणंही गुन्हा असून, चाईल्ड पोर्नोग्राफी बघणंही गुन्हा ठरवण्यात आलेलं आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ मधील कलम ६७ (अ) आणि भादंवि कलम २९२, २९३, २९४, ५००, ५०६ आणि ५०९ यानुसार शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास किंवा १० लाखांचा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.