सोमवारी रात्री मुंबई क्राईम ब्रांचनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक केली आहे. त्याच्यासोबतच त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थार्प याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज कुंद्रासोबतच अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील अडचणीत आली आहे. राज कुंद्राच्या कंपन्यांमध्ये किंवा त्याच्या पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा हात आहे किंवा नाही, याची देखील सखोल चौकशी होणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई क्राईम ब्रांचनं राज कुंद्राच्या अटकेविषयी माहिती देतानाच शिल्पा शेट्टीला मोठा दिलासा दिला आहे.
शिल्पाच्या आगामी सिनेमांवर सावट!
राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीच्या आगामी चित्रपटांवर मोठं संकट निर्माण झालं आहे. तब्बल १४ वर्षांनंतर हंगामा २ मधून पुनरागमन करण्यासाठी शिल्पा सज्ज होती. त्यासोबतच बहुचर्चित निकम्मा सिनेमामध्ये देखील शिल्पा विशेष भूमिकेत झळकणार आहे. २३ जुलै रोजी हंगामा २ देखील रिलीज होणार आहे. मात्र, त्याआधीच हे प्रकरण उघड झाल्यामुळे आणि त्यात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यामुळे तिच्या या आगामी सिनेमांनाही त्याचा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
क्राईम ब्रांचचं पीडितांना आवाहन
या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई क्राईम ब्रांचनं दुपारी पत्रकार परिषदेमध्ये राज कुंद्रानं कशा पद्धतीने अश्लील चित्रपट निर्मितीचा हा कारभार चालवला होता, त्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला मोठा दिलासा दिल्याचं स्पष्ट झालं. “अजूनपर्यंत या सर्व प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीचा सक्रिय सहभाग असल्याचं सिद्ध करणारं काहीही शोधून काढण्यात अजून तरी आम्हाला शक्य झालेलं नाही. आम्ही तपास करत आहोत. आमचं या प्रकरणातील पीडितांना आवाहन आहे की त्यांनी पुढे यावं आणि क्राईम ब्रांचशी संपर्क साधावा. आम्ही त्यांच्या तक्रारींवर योग्य ती कारवाई करू”, अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिसांचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे.
We have not been able to any find any active role (of Shilpa Shetty) yet. We are investigating. We’ll appeal to the victims to come forward and contact the Crime Branch Mumbai. We’ll take appropriate action: Milind Bharambe, Joint Commissioner of Police, Mumbai pic.twitter.com/CBgHVs4cnk
— ANI (@ANI) July 20, 2021
आधी फोन, मग ऑडिशन आणि नंतर न्यूड सीन…कशी होती मोडस ऑपरेंडी?
क्राईम ब्रांचकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नवोदित महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट स्टोरीजमध्ये ब्रेक देतो असं सांगून बोलावलं जायचं. ऑडिशन, शॉट्स घेण्यासाठी बोलावलं जायचं. त्यात बोल्ड सीन्स करावे लागतील असं सांगितलं जायचं. नंतर त्या बोल्ड सीन्सचं पर्यवसान सेमी न्यूड आणि न्यूड सीन्समध्ये व्हायचं. अशा प्रकारे छोट्या क्लिप्स, शॉर्ट फिल्म्स काही वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्सला विकल्या जात होत्या.
‘”राज कुंद्रा म्हणाला न्यूड ऑडिशन दे” – वाचा सविस्तर
सागरिका सोना सुमनचा खळबळजनक आरोप
राज कुंद्राला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत असून, अभिनेत्री सागरिका सोना सुमनने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. राज कुंद्राने नग्न होऊन ऑडिशन द्यायला सांगितलं होतं, असा आरोप सागरिकाने केला आहे. “अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये मोठे लोक सहभागी आहेत. राज कुंद्रा याचं नाव समोर आलं आहे. लॉकडाउनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट २०२० मध्ये मला एका वेब सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर आली होती. मी होकार दिल्यानंतर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाइन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी झाल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली गेली”, अशी माहिती सागरिका सोना सुमनने दिली आहे.