मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर विरोधकांनी अदानी समूहाबाबत आक्रमक पवित्रा घेतला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वेगळी भूमिका मांडली. अदानी समूहाला ठरवून लक्ष्य करण्यात आल्याचे नमूद करत पवार यांनी ‘जेपीसी’ चौकशीच्या मागणीलाही विरोध केला.
शरद पवार यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत संसद अधिवेशन, अदानी आदी अनेक मुद्यांवर भाष्य केले. संसदेच्या वाया गेलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज व्हावे, या दृष्टीने सत्ताधारी पक्षाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न न झाल्याने पवार यांनी खंत व्यक्त केली.
‘‘हिंडेनबर्ग अहवालातून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दय़ावरून संसदेच्या संयुक्त चिकित्सा समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत बराच काळ कामकाज होऊ शकले नाही. त्याचे पडसाद भांडवली बाजारात उमटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यानंतर संयुक्त चिकित्सा समितीची मागणी लावून धरणे योग्य नाही. अहवालाच्या मुद्दय़ावरून देशभरात गोंधळ झाला आणि त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली’’, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
‘‘पूर्वी सरकारवर टीकेची झोड उठविण्यासाठी टाटा-बिर्ला समूहांची नावे विरोधकांकडून घेतली जात होती. या समूहांचे देशाच्या विकासातील योगदान सर्वाना माहीत आहे. आताच्या काळात अदानी-अंबानी समूहांची नावे सरकारला लक्ष्य करताना घेतली जातात. अंबानी समूहाने पेट्रोकेमिकल्स आणि अन्य क्षेत्रांत भरीव काम केले आहे. अदानी समूहाने वीज व अन्य क्षेत्रांत मोठे काम केले आहे. देशाला त्याची गरज आहे ना? या समूहांनी बेकायदा किंवा काही चुकीचे केले असल्याचे पुरावे असतील तर टीका करण्याचा हक्क लोकशाहीत आहेच, पण पुरावे नसल्यास ते चुकीचे आहे’’, असे पवार म्हणाले.
संसदेत वेगवेगळय़ा मुद्दय़ांवर गदारोळ होण्याचे अनेक प्रसंग गेल्या ५६ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत पाहिले, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘संसदेत गोंधळ झाल्यावर तत्कालीन संसदीय कामकाजमंत्री गुलाम नबी आझाद यांच्याकडून तडजोडीसाठी किंवा मध्यम मार्ग काढण्यासाठी विरोधकांशी सायंकाळी चर्चा होत असे आणि दुसऱ्या दिवशी संसदेतील कामकाज सुरळीत होत असे.’’ संयुक्त चिकित्सा समितीच्या नियुक्तीसाठी संसदेचे कामकाज रोखण्याच्या रणनीतीमागे काँग्रेसची भूमिका काय होती, याबाबत पवार यांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असे भाकीतही पवार यांनी केले.
‘अदानी’बाबत १९ विरोधी पक्षांचे एकमत : काँग्रेस
अदानी मुद्दय़ावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मत वेगळे असू शकेल. पण, अदानी हा खरा मुद्दा आहे, यावर १९ विरोधी पक्षांचे एकमत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केली. अदानी समूहाविरोधातील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, याविषयी १९ समविचारी विरोधी पक्षांचे एकमत आहे, असे ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह २० विरोधी पक्षांची एकजूट कायम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.