इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता
देशभरातील विजेचे मीटर बदलून त्याऐवजी प्रीपेड स्वरूपाचे स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकल्प केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाने हाती घेतला आहे. याअंतर्गत मुंबईत ‘बेस्ट’च्या साडेदहा लाख वीज ग्राहकांचे मीटर बदलण्याचे काम ‘अदानी एनर्जी सोल्युशन्स’ कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने दक्षिण मुंबईतून वीज मीटर बदलण्यास सुरुवात केली आहे.
स्मार्ट मीटर बसवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी बेस्ट प्रशासनाने सुरू केली आहे. बेस्टच्या साडेदहा लाख वीज ग्राहकांचे मीटर बदलण्याच्या कामाला १ डिसेंबरपासून सुरुवात झाली. बेस्टने मीटर बदलण्याच्या कंत्राटासाठी गेल्या वर्षी निविदा प्रक्रिया राबवली होती. त्याद्वारे ‘अदानी एनर्जी सोल्युशन्स’ला वीज मीटर बदलण्याचे आणि १० वर्षांपर्यंत त्यांची देखभाल करण्याचे १३०० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार अनुदानही देणार आहे.
हेही वाचा >>> ‘म्हाडा’च्या ५६ वसाहतींचे वाढीव सेवा शुल्क माफ; मुंबईतील ५० हजार रहिवाशांना दिलासा
येत्या वर्षभरात मुंबई शहरात साडेदहा लाख स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असून त्यानंतर ग्राहकांना प्रीपेड पद्धतीने आपल्या वीज देयकाची रक्कम भरावी लागणार आहे. विजेच्या वापराच्या प्रमाणात ग्राहकांना देयकाची रक्कम भरावी लागणार आहे. विविध कारणांमुळे प्रीपेड मीटरला मोठा राजकीय विरोध होत असून हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेतून हे काम कंपनीला मिळाले आहे. तसेच या कंपनीने केवळ बेस्टच्या हद्दीतच नाही तर उपनगरांतही आपल्या पाच लाख ग्राहकांचे वीज मीटर बदलले आहेत.
कर्मचाऱ्यांचे काय?
बेस्टमध्ये सुमारे दोनशे ‘मीटर वाचक’ या पदावरील कर्मचारी आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर या कर्मचाऱ्यांचे काय? असा सवाल बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे. अदानी कंपनीचे स्वत:चे लाखो ग्राहक असताना तेथे स्मार्ट मीटर का लावले जात नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
बेस्टच्या खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. बेस्टच्या ग्राहकांपैकी ४० टक्के ग्राहक हे झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यांना प्रीपेड पद्धतीने देयक भरणे जमेल का? – रवी राजा, माजी नगरसेवक, काँग्रेस</p>
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचा आणि बेस्ट उपक्रमाचाही फायदा होईल. या मीटरमुळे ग्राहकाला आपण विजेचे किती युनिट वापरले ते तत्काळ कळू शकेल. – सुनील गणाचार्य, भाजप
ग्राहकांना सवलत?
ग्राहकांना पोस्ट पेड आणि प्रीपेड असे दोन्ही पर्याय असतील, पण प्रीपेड ग्राहकांना वीजदरात सवलत दिली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज मीटरचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.