मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास अदानी समुहाच्या माध्यमातून केला जात आहे. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर पुनर्विकासाला चालना मिळेल अशी घोषणा करण्यात आली असून धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) आता यासंदर्भात धारावीत जोरदार फलकबाजी सुरू केली आहे. संपूर्ण धारावीत विविध भाषेत पुनर्विकासासंंबंधीची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र यावेळी बहुभाषिक धारावीत गुजराती भाषेत लावण्यात आलेल्या फलकांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
धारावी पुनर्विकासाला मोठ्या संख्येने धारावीकरांनी विरोध केला आहे. धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून रहिवाशांनी आपला विरोध, माध्यम वेळोवेळी राज्य सरकारसमोर मांडला आहे. मात्र अद्यापही रहिवाशांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. अशा वेळी रहिवाशांचे मन वळविण्यासाठी, धारावी पुनर्विकासाची माहिती धारावीकरांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून डीआरपीपीएलने धारावी परिसरात धारावी पुनर्विकासासंबंधीचे फलक लावले आहेत. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू, गुजराती अशा अनेक भाषांमधील फलक लावण्यात आल्याची माहिती धारावीतील रहिवाशांनी दिली.
हेही वाचा – मुंबईत ‘नाताळ’चा उत्साह, रोषणाईचा झगमगाट आणि आनंदाची उधळण
हेही वाचा – मुंबई : कांदळवनात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे, निविदांची छाननी सुरू
धारावी पुनर्विकासाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने डीआरपी (धारावी पुनर्विकास प्रकल्प) आणि एसआरएची (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) रचना केली आहे. त्यामुळे धारावी पुनर्विकासाची अंमलबजावणी सहज होईल, अशा आशयाचे विविध भाषेतील फलक मोठ्या संख्येने धारावीत लावण्यात आले आहेत. मात्र गुजराती भाषेतील फलकांचीच चर्चा सध्या धारावीत सुरू आहे. इतक्या मोठ्या संख्येने फलकबाजीची गरज काय, असा प्रश्न यानिमित्ताने धारावीकरांनी उपस्थित केला आहे.