‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – अंधेरी मेट्रो ७’ मार्गिकेसाठी अदानी समुहाकडून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अदानी समुहात याबाबत नुकताच भागिदारी करार करण्यात आला. या करारानुसार दोन्ही मार्गिकांसाठी दरवर्षी १२० दशलक्ष युनिटहून अधिक वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
अदानी समुहाकडून मुंबई उपनगरात वीजपुरवठा करण्यात येतो. आजघडीला मुंबईत अदानीचे ३१ लाख वीज ग्राहक आहेत. यात निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. आता हा समूह मुंबईतील महत्त्वाच्या अशा ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेलाही वीजपुरवठा करणार आहे. यासाठी एमएमआरडीए आणि अदानी यांच्यात करारही झाला आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिकाचा २० किमीचा पहिला टप्पा यापूर्वीच सेवेत दाखल झाला आहे. दुसरा टप्पा महिन्याभरात सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.