‘आदर्श’ घोटाळ्याची चौकशी करणाऱया आयोगाच्या अहवालातील निष्कर्षांमुळे आपल्याला न्याय मिळाला नसल्याचा युक्तिवाद माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून ‘आदर्श’ अहवालाबद्दलची आपली भावना मांडलीये. चव्हाण यांच्या जवळील सूत्रांनी याबाबत माहिती दिली.
आदर्शप्रकरणी अहवाल सादर करण्याअगोदर आपली बाजू ऐकून घेण्यात यावी, असे आवाहन आपण केले होते. मात्र, द्विसदस्यी आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, हा अहवाल अतिशय चुकीचा असून, त्यामुळे माझ्यावर खूप अन्याय झाला आहे. अहवालात माझ्यावर ठपका ठेवण्यापूर्वी माझी बाजू ऐकून घेण्यात आलीच नाही. आयोग जर माझ्यावर ठपका ठेवणार होते, तर त्यांनी चौकशी आयोग कायद्यातील कलम आठनुसार माझी बाजू ऐकून घ्यायला हवी होती. मात्र, तसे करण्यात आलेले नाही, याकडे त्यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
चौकशी आयोगाच्या अहवालामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा जाणार असेल, तर कोणतेही निष्कर्ष काढण्याअगोदर त्या व्यक्तीची बाजू ऐकून घेतलीच पाहिजे. संबंधित व्यक्तीने दिलेले पुरावे आयोगाने पडताळून पाहायला हवेत, हे देखील आयोगाच्या सदस्यांना माहिती होते, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader