‘आदर्श’ घोटाळ्यातील आरोपींवर पर्यावरण संरक्षण कायदा, महाराष्ट्र विभागीय नगरनियोजन कायदा (एमआरटीपीए) आणि बेनामी मालमत्ता कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. विशेष म्हणजे या याचिकेत गोऱ्हे यांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय अजय संचेती यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे.
न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली. मात्र खंडपीठाने ‘आदर्श’ घोटाळ्याशी संबंधित कुठल्याही याचिकेवर आपण सुनावणी घेऊ  शकत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात विविध निर्णय घेताना आपण राज्याच्या न्याय व विधी विभागाचे प्रमुख सचिव म्हणून कार्यरत होतो आणि राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देत असल्याचे न्यायमूर्ती अचलिया यांनी यापूर्वीच याचिकेवरील सुनावणी न घेण्यामागील कारण स्पष्ट केले होते.
घोटाळ्याच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या द्विसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारावर गोऱ्हे यांनी ही याचिका केली आहे. आयोगाने आपल्या अंतिम अहवालात सोसायटीने किनारपट्टी भागात मोडणाऱ्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक ती पर्यावरणीय परवानगी घेतली नसल्याचा निर्वाळा दिला आहे. याशिवाय सोसायटीतील १०० फ्लॅटमधील २२ फ्लॅट बेनामी आणि त्यातील आठ फ्लॅट संचेती यांच्या नावे असल्याचेही आयोगाने अहवालात नमूद केले होते. आयोगाच्या या दोन निर्वाळ्यांचा मुद्दा लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षण कायदा आणि बेनामी मालमत्ता कायद्याअंतर्गतही घोटाळ्यातील आरोपींवर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे गोऱ्हे यांनी याचिकेत म्हटले आहे.

Story img Loader