‘आदर्श’ अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा आदेश राहुल गांधी यांनी दिल्याने राज्यातील काँग्रेसच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटणार आहेत. पक्ष आणि सरकारवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच मांड घट्ट केली असतानाच त्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशा हालचाली पक्षाकडून सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे, ‘आदर्श’ प्रकरणात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आता अधिक अडचणींना तोंड द्यावे लागेल, तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मात्र यातून सहीसलामत बाहेर पडण्याची चिन्हे आहेत.
अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला दाखल करण्यास परवानगी देऊ नये म्हणून राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्यावर दिल्ल्लीतून दबाव आणल्याची चर्चा आहे. एकूणच अशोक चव्हाण यांना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात काँग्रेसने आपल्याच मुख्यमंत्र्याची कोंडी केली आहे.
चौकशी अहवालात सुशीलकुमार शिंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असला तरी तो सौम्य स्वरूपाचा आहे. वित्त विभागाच्या सल्ल्याकडे शिंदे यांनी दुर्लक्ष केले एवढाच ठपका शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विरोधक शिंदे यांच्यावर आरोप किंवा टीका करण्याची शक्यता असली तरी हे प्रकरण त्यांच्यावर शेकण्याची शक्यता नाही.

Story img Loader