राज्यापुढची आव्हाने लक्षात घेऊन येत्या पाच वर्षांत पोलीस दलातील रिक्त पदे भरली जातील, त्याचबरोबर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची अतिरिक्त ६३ हजार पदे नव्याने निर्माण केली जातील. तसेच साकेत येथील ठाणे पोलीस आयुक्तालय क्रीडा संकुलावर राज्य पोलीस क्रीडा अकादमी स्थापन करण्यात येईल, त्यासाठी सर्वच सुविधांसह निधी दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी  केली.
साकेत येथील ठाणे पोलीस आयुक्तालय क्रीडा संकुलावर २५वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात पाटील बोलत होते. पोलिसांच्या कामाची व्याप्ती वाढत असून तितक्या गतीने जनतेच्या अपेक्षा आपल्याकडून वाढत आहेत. अनेक राजकीय आणि सामाजिक प्रश्नाची उत्तरे पोलीस दलाकडून मागितली जातात. वास्तविकता टीका करत का होईना, ही उत्तरे आपल्याकडून मागितली जातात, त्या वेळी जनतेच्या अंतिम विश्वासाचे ठिकाण पोलीस आहेत, ही बाब अलीकडेच सिद्ध झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्याने मागील काही वर्षांत अति गंभीर स्वरूपाच्या संकटांचा मुकाबला केला आहे. देशाच्या सीमेवर ज्या घटना गेल्या आठ ते दहा दिवसांत घडत आहेत, त्या देशाच्या सहनशीलतेचा अंत बघणाऱ्या आहेत. तरीही  देशाचे सैन्य दल सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ज्या वेळी सीमेवर येऊन लढणे शक्य होत नाही, त्या वेळी सीमेच्या आत घुसून निरापराध जनतेच्या जीविताचे आणि मालमत्तेचे विध्वंस करण्याचे काम देशाच्या शत्रुकडून वेळोवेळी झाले आहे. त्यामुळे या पुढच्या काळात सीमा संरक्षण जितके महत्त्वपूर्ण आहे, तितकेच आतील सुरक्षा व्यवस्थाही महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी सांगितले.  मॉर्निग वॉक किंवा खेळासाठी वयोवृद्घ नागरिक तसेच महिलांसाठी साकेत येथील क्रीडांगण सुरक्षेसह उपलब्ध करून दिले तर, ठाणेकर जनतेचीही गरज पूर्ण होईल, त्याची लवकरच सुरुवात करावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी ठाणे पोलीस आयुक्तांना दिल्या. या कार्यक्रमप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, पालकमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ, ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, राजकीय नेते आणि नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विजेत्या स्पर्धकांसह संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी झालेल्या शूटिंग स्पर्धेमध्ये चार पारितोषिके पटकाविणारे ठाणे पोलीस दलातील अप्पर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनाही पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रत्येक वर्षी क्रीडा सामने भरविण्यासाठी दोन कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी करतो, प्रत्येक वर्षी आश्वासन मिळते, आश्वासन देणारे मुख्यमंत्री बदलतात. पण, आश्वासन कायमच राहते. पण, या वर्षी आश्वासन अजित दादांनी दिले असून ते शब्दाचे पक्के असल्याने दोन कोटी रुपये आश्वासनाची रक्कम राहणार नाही, तर पोलीस दलातील क्रीडापटूांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्पर्धेसाठी निश्चितच उपलब्ध होतील, अशी ग्वाही आर. आर. पाटील यांनी यावेळी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा