मुंबई : मुंबई शहरातील ‘महालक्ष्मी यात्रा’ ही प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. ही यात्रा ३ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सुरू असेल. महालक्ष्मी यात्रेदरम्यान ‘महालक्ष्मी’च्या दर्शनासाठी प्रचंड संख्येने येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई उपनगरातून तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मीदरम्यान विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

शहराच्या विविध भागांतून महालक्ष्मी मंदिरामार्गे प्रवर्तित होणाऱ्या बसमार्गावरील बसफेऱ्यांमध्ये देखील आवश्यकतेप्रमाणे वाढ करण्यात येईल. महालक्ष्मी मंदिराला भेट देणारे प्रवासी मोठ्याप्रमाणावर भायखळा स्थानक व महालक्ष्मी स्थानक येथे लोकलने येऊन तेथून बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर बेस्ट उपक्रमाच्या जास्तीत जास्त बसगाड्या भायखळा, महालक्ष्मी स्थानक ते महालक्ष्मी मंदिर या दरम्यान चालवण्यात येतील. भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची बस स्थानकावर नियुक्ती करण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी लवकरच पर्यटकांच्या सेवेत

हेही वाचा – मुंबई : देवनार पाडा स्मशानभूमी अंधारात, विजेचे दिवे बंद असल्याने नागरीकांना मनस्ताप

महालक्ष्मी यात्रेदरम्यान बेस्ट बसमार्ग ३७, ५७, १५१, ए-६३, ए-७७, ए-७७ जादा, ए-३५७, ८३ या बसमार्गावर दररोज २३ अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येतील. या व्यतिरिक्त लोकल प्रवाशांसाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) येथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरीता गर्दीच्यावेळी लालबाग, चिंचपोकळी व महालक्ष्मी रेल्वे स्थानकमार्गे नवरात्रीच्या ९ दिवसांच्या कालावधीत विशेष बससेवा चालवण्यात येतील. महालक्ष्मी यात्रेदरम्यान बेस्ट उपक्रमातर्फे उपलब्ध असलेल्या विशेष बससेवेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.