मुंबई : राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त सीईटी घेण्यात येणार आहे. या अतिरिक्त सीईटीसाठी विद्यार्थ्यांना शनिवार, २९ जून ते बुधवार, ३ जुलै या कालावधीत https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज नोंदणी व निश्चिती करता येणार आहे.

तसेच, या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी २९ मे रोजी परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त सीईटी देता येणार आहे, असे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – मुंबई : पोलीस भरतीत सहभागी उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य सापडले, गुन्हा दाखल

हेही वाचा – विधान परिषदेसाठी भाजप नेत्यांची मोर्चेबांधणी; पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील प्रयत्नशील

विद्यार्थ्यांचे दोन्ही परीक्षांपैकी सर्वोत्तम असणारे पर्सेन्टाइल प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम पर्सेन्टाइलची गुणपत्रिका संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक असेल. अतिरिक्त सीईटीची निकाल प्रक्रियासुद्धा पर्सेन्टाइल पद्धतीने करण्यात येणार आहे. अतिरिक्त सीईटी ही महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. तसेच, परीक्षेची तारीख निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येईल. अतिरिक्त सीईटीची तारीख तात्काळ जाहीर करावी, अन्यथा रिक्त जागांवर विद्यापीठ व महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा करावा. याबाबत सीईटी कक्षाच्या आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली, असे मनसेचे सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.