मुंबई : मुंबईतील पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून नालेसफाईच्या कामांना नुकतीच सुरूवात करण्यात आली असून पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी पाहणी केली. नाल्यांमधील सांडपाण्याच्या पृष्ठभागावर वाहणारा आणि तरंगणारा घनकचरा विशेषत: प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी जाळ्या बसवाव्यात, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले. तसेच आवश्यक त्या ठिकाणी नाल्याकडे जाणाऱ्या गल्ली परिसरातील छोटे रस्ते जाळ्या लावून बंद करता येतील का याचीही चाचपणी करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे मंगळवार, २५ मार्चपासून सुरू करण्यात आली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पूर्व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेस्वच्छता कामांची गुरुवारी पाहणी केली. त्यात शीव-पनवेल महामार्गावरील मानखुर्द नाला, देवनार नाला, लक्ष्मीबाग नाला, पूर्व द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता (जेव्हीएलआर) येथील कल्वर्ट, भांडुप येथील दयानंद अँग्लो वेदिक (डिएव्ही) महाविद्यालय नाला, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील नाला, एपीआय नाला आणि उषा नगर नाला येथे प्रत्यक्ष भेट देत बांगर यांनी नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला.

मानखुर्द नाल्यात मोठ्या प्रमाणात घरगुती घनकचरा तरंगताना दिसून आला. नाल्याच्या दुतर्फा दाटीवटीची वस्ती घरे असून या घरांमधून कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. नाल्यांमधील घनकचरा विशेषतः प्लास्टिक कचरा पुढे अरुंद ठिकाणी अडकून पाण्याच्या प्रवाहात अवरोध निर्माण करतात. त्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. तरी शक्य त्या ठिकाणी नाल्याच्या दोन्ही बाजूस उंच जाळ्या लावणे, आवश्यक त्या ठिकाणी नाल्याकडे जाणाऱ्या गल्ली परिसरातील छोटे रस्ते जाळ्या लावून बंद करणे, या पर्यायांची चाचपणी करावी, अशी सूचना बांगर यांनी केली.

देवनार नाल्याच्या स्वच्छतेची पाहणी करताना बांगर म्हणाले की, देवनार नाल्याच्या दुतर्फा भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. नाल्याच्या ठिकाणी जाळी लावली असता, ती चोरीस जाण्याची शक्यता लक्षात घेवून आवश्यक त्या ठिकाणी फायबर रिइन्फोर्सड् पॉलिमरच्या (F.R.P.) जाळ्या लावाव्यात, अशा सूचना देखील बांगर यांनी केली.

लक्ष्मीबाग नाला येथील सांडपाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारा व वाहणारा घनकचरा रोखण्यासाठी तरंगणारी जाळी (ट्रॅश ब्रूम) बसविण्यात आली आहे. त्याची उपयुक्तता लक्षात घेता जाळी लावण्याची अंमलबजावणी इतर ठिकाणी करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.

अभियंत्यांनी कार्यस्थळी उभे राहावे

मोठ्या व छोट्या नाल्यातून गाळ काढण्याची कार्यवाही अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे होण्यासाठी दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी पूर्ण वेळ उपस्थित रहावे. गाळ काढण्याच्या कामाचे नालेनिहाय व दिवसनिहाय नियोजन करावे. संगणकीय प्रणालीमध्ये दररोज अद्ययावत माहिती भरावी. तसेच ३१ मेपर्यंत नाले स्वच्छतेची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले.