मुंबई, भिवंडी आणि मालेगाव पाठोपाठ राज्यातील १८ प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. गोवरचा उद्रेक झालेल्या प्रभागांमधील मुलांना रूबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात येत आहे. उद्रेकग्रस्त भागात राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत चार लाख बालकांचा शोध घेण्यात आला आहे. आतापर्यंत यापैकी १ लाख ५२ हजार बालकांना अतिरिक्त लसची मात्रा देण्यात आली असून तीन लाख ३९ लाख बालके अद्यापही लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.या बालकांना गोवर रूबेलाच्या लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात येणार आहे. गोवरला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>“हे भाजपाच्या नादाला कुठे लागलेत, मोर्चा…”, संजय राऊतांचं संभाजीराजेंना प्रत्युत्तर
राज्यात वाढत असलेल्या गोवरला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना गोवर रूबेला लसीचा अतिरिक्त मात्रा देण्यात येत आहे. त्यासाठी राज्यात उद्रेक झालेल्या भागांमधील बालकांचा शोध घेण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा – भाईंदर, वसई – विरार, पनवेल, रायगड, मालेगाव, धुळे, जळगाव, पुणे, पिंपरी – चिंचवड आणि औरंगाबाद या ठिकाणी गोवरचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक ४८५ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल मालेगावमध्ये ७१ ठाण्यात ६१ तर भिवंडीमध्ये ५३ गोवरचे निश्चित झालेले रुग्ण सापडलेले आहेत. गोवरचा उद्रेक झालेले भागातील नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील बालकांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने एक हजार २६७ सर्वेक्षण पथके कार्यरत केली आहेत. या पथकाने आतापर्यंत २१ लाख ९१ हजार ७७३ घरांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणांतर्गत उद्रेकग्रस्त भागात गोवर रूबेलाच्या अतिरिक्त लसीची मात्रा देण्यासाठी चार लाख ९१ हजार ६७० बालकांचा शोध घेण्यात आला आहे. यापैकी एक लाख ५२ हजार २०७ बालकांना आतापर्यंत अतिरिक्त लसची मात्रा देण्यात आली आहे. तीन लाख ३९ लाख ४६३ बालके अद्यापही लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे गोवर रूबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या अतिरिक्त सत्रांना फारच अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. गोवर रूबेला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे
हेही वाचा >>>मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गात महिलांसाठी २०० प्रसाधनगृहे बांधणार
विशेष लसीकरण मोहीमेअंतर्गत ३७ हजार बालकांचे लसीकरण
राज्यातील उद्रेकग्रस्त भागांमध्ये १५ डिसेंबरपासून विशेष लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तीन दिवसांमध्ये या मोहिमेअंतर्गत राज्यात ३७ हजार ११२ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईमधील एक हजार ३०१ बालकांचा समावेश आहे.