प्रवासी क्षमता वाढवणे आणि लोकल प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येत असतानाच मध्य रेल्वेवर मात्र अतिरिक्त फेऱ्यांना खिळ बसला आहे. मध्य रेल्वेवर १५ डबा जलद लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी नवीन मार्गिकेची गरज असून सध्याच्या वेळापत्रकातही स्थान मिळू शकलेले नाही. त्यामुळे १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>मुंबई: वेब पोर्टल ‘रिएल इस्टेट एजंट’ असल्याबाबत संदिग्धता कायम
मध्य रेल्वेवर २०१३ मध्ये सीएसएमटी – कल्याणदरम्यान एक १५ डबा जलद लोकल सुरू करण्यात आली. परिणामी, १२ डब्यांच्या लोकलच्या तुलनेत १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ झाली. यासाठी सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांतील जलद मार्गावरील फलाटांची लांबी वाढवण्यात आली. या लोकल गाडीमुळे प्रवासी क्षमता वाढल्याने गर्दीच्या प्रवासातून थोडाफार दिलासा मिळू लागला. मार्च २०१९ मध्ये या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आणि त्यात आणखी सहा फेऱ्यांची भर पडली. सध्या दोन १५ डबा लोकल असून त्यांच्या दररोज २२ फेऱ्या होत आहेत. मध्य रेल्वेवर या लोकलच्या फेऱ्या वाढण्यासाठी कल्याण – कर्जत मार्गावर १५ डबा प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) आणि कल्याण – कसारा मार्गावर १५ डबाचे काम मध्य रेल्वेकडून करण्यात येणार होते. मात्र हा प्रकल्प पुढे सरकलाच नाही. मध्य रेल्वेवर कल्याण यार्डचे नूतनीकरण, कल्याण – कसारा तिसरी – चौथी मार्गिका, कल्याण – बदलापूर तिसरी – चौथी मार्गिकाही सेवेत दाखल झाल्यानंतरच १५ डब्यांच्या लोकलची संख्या आणि फेऱ्या वाढू शकतील, असेही स्पष्ट केले. मात्र यातील कोणत्याही प्रकल्पाला गती मिळालेली नाही. त्यामुळे १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढण्यात अडथळा निर्माण झाला आहे.
तूर्तास १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा कोणताही विचार नाही. नवीन मार्गिका उपलब्ध झाल्याशिवाय या फेऱ्यांमध्ये वाढ होऊ शकत नाही. १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढवल्यास १२ डबा लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्याशिवायही पर्याय नसेल. सध्यातरी १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार नाहीत. -रजनीश गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे