मुंबई : कुर्ला येथील भाभा रुग्णालयात रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी परिचारिकेला मारहाण केल्यानंतर परिचारिकांनी २ मे २०२४ रोजी काम बंद आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. या घटनेनंतर भाभा रुग्णालय प्रशासनाने काही तातडीच्या उपाययोजना करत सुरक्षा व्यवस्था आणि प्रवेश यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
भाभा रुग्णालयात १ मे रोजी रात्री ११ वाजता महिला रुग्ण व तिच्या नातेवाईकांनी परीचारिकेला शिवीगाळ करीत मारहाण केल्यामुळे संतप्त परिचारिकांनी २ मे रोजी बेमुदत आंदोलन केले होते. या घटनेची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेचे उप प्रमुख सुरक्षा अधिकारी परिमंडळ ५ यांनी रुग्णालयाला अतिरिक्त सुरक्षा रक्षक देण्याचे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनामार्फत पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आला आहे. तसेच नातेवाईकांसाठी असलेली प्रवेशिका पद्धत परिणामकारकपणे वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हे कक्षामध्ये थांबण्यासाठीच्या वेळांवर नियंत्रण आणणे शक्य होईल. तसेच या वेळांव्यतिरिक्त कोणताही नातेवाईक कक्षामध्ये थांबणार नाही.
हेही वाचा – रेल्वे प्रवाशांना विलंबयातना, एकीकडे उन्हाच्या झळा, तर दुसरीकडे लोकल खोळंबा
हेही वाचा – मुंबईत शनिवार, रविवारी असह्य उकाडा
सुरक्षा रक्षकांकडूनच प्रवेशिकांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्ण आणि कर्मचारी यामधील वादाचे प्रसंग टाळणेही शक्य होईल. रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढण्यासोबतच कर्मचारी वर्गाचेही समुपदेशन करण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.