लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत वाढणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन परतीच्या प्रवासासाठी उन्हाळी विशेष जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे. महाबळेश्वर – महाड – बोरिवली / मुंबई सेंट्रल आणि महाबळेश्वर – पुणे – बोरिवली / मुंबई सेंट्रल या मार्गावर या विशेष जादा बस धावणार आहेत.

एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने महाबळेश्वर पर्यटनाच्या निमित्ताने उन्हाळ्यात जादा बस फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाबळेश्वरहून मुंबई येथे परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. महाबळेश्वर आगारातून बोरिवली, पुणे, नाशिक, पणजी, ठाण्यासाठी जादा फेऱ्या धावणार आहेत. दरम्यान, मुंबई विभागातून नियमित बस सुरू असून उन्हाळी विशेष जादा लांब पल्ल्याच्या बसचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही, अशी माहिती एस.टी. महामंडळातील अधिकाऱ्याने दिली.

आणखी वाचा- ‘मेट्रो ४’चे ४९ टक्के काम पूर्ण, खटल्याचा निकाल एमएमआरडीएच्या बाजूने लागल्याने कामास वेग

उन्हाळी विशेष जादा बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत, ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनें’तर्गत ७५ वर्षांवरील सर्व प्रवाशांना तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने उन्हाळी पर्यटनासाठी जादा बसची सोय करण्यात आल्याचे एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader