आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ आणि रेल्वे यांनी जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीने आपल्या २५० आगारांतून ३३५० जादा बसगाडय़ा सोडण्याशिवाय आणखी १५० जादा गाडय़ांची तरतूद केली आहे. त्याशिवाय पंढरपुरात तीन ठिकाणी बसस्थानकेही उभारण्यात आली आहेत. तर रेल्वेतर्फे अमरावती/खामगाव ते पंढरपूर यादरम्यान आठ विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
विविध आगारांमध्ये एसटीने ग्रुप आरक्षणाची सोयही ठेवली आहे. एखाद्या गावातील एकगठ्ठा लोकांना एकत्रितपणे पंढरपूरची वारी करायची असल्यास गावातील नागरिकांनी आगारप्रमुखांकडे प्रवाशांची यादी देऊन बसगाडय़ा आरक्षित कराव्यात, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. त्याशिवाय वारीसाठी पंढरपूर शहरात तीन बसस्थानके असतील. या तीनही बसस्थानकांवरून ठरावीक प्रदेशांमध्ये गाडय़ा सुटतील.
भीमा बसस्थानकावरून विदर्भ आणि मराठवाडा येथील जिल्ह्य़ांसाठी बस सुटतील. तसेच विठ्ठल साखर कारखाना स्थानकाहून खान्देशमधील जिल्ह्य़ांसाठी बसगाडय़ा जातील. तर चंद्रभागा बसस्थानकामधून पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि ठाणे येथील जिल्ह्य़ांत बसगाडय़ा सुटतील. या बसस्थानकांपर्यंत जाण्यासाठी शहरात ५० शटल सेवाही सुरू असतील.
तसेच मध्य रेल्वेतर्फेही अमरावती/खामगाव ते पंढरपूर यादरम्यान आठ विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. ०११५५ अमरावती/खामगाव-पंढरपूर ही गाडी २१, २२, २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी दोन वाजता अमरावतीहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०५ वाजता पंढरपूरला पोहोचेल, तर ०११५६ पंढरपूर-अमरावती/खामगाव ही गाडी २२, २३, २८ आणि २९ जुलै रोजी संध्याकाळी चार वाजता पंढरपूरहून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता अमरावतीला पोहोचेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा