सध्या राज्यात ७८ टक्के एलपीजी ग्राहक, तर ६१ टक्के बँकांशी संबंधित आधार क्रमांकांचे सलग्नीकरण पूर्ण झाले आहे. ही गती आणखी वाढविण्यासाठी गॅस सिलेंडर वितरकांकडेही आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात येईल़  तसेच आधार कार्डाची प्रिंट आऊट काढण्याचीही व्यवस्था तेथेच करून देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी दिली़  
शासकीय योजनांच्या लाभासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आधार क्रमांक नोंदणीत राज्यातील परिस्थिती समाधानकारक असली तरी त्यात अजून गती आणण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या डिसेंबरअखेपर्यंत ९० टक्के आधार नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण करावे, असे आदेशही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर ‘अन्न सुरक्षा’, ‘सुकन्या’, ‘राजीव गांधी जीवनदायी’, ‘मनोधैर्य’ या गरिबांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.  सध्या देशात महाराष्ट्राचा आधार नोंदणीत दुसरा क्रमांक आहे. आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. वर्धा जिल्ह्य़ात सर्वाधिक म्हणजे ९३ टक्के आधार नोंदणी झाली आहे. या वेळी अन्न व नागरी पुरवठा-मंत्री अनिल देशमुख, महिला व बाल विकासमंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.्र

Story img Loader