मशीद बंदर येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर तडीपार आरोपीने चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी २६ वर्षीय आरोपीला अटक केली. या आरोपीविरोधात यापूर्वी चार गुन्हे दाखल असून त्याला मुंबईतून तडीपार करण्यात आले आहे. असे असतानाही तो मुंबईत वावरत होता. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास बबन थोरात घाटकोपर येथे वास्तव्यास असून सध्या पायधुनी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते पायधुनी पोलिसांच्या मोबाइल क्रमांक ५ वर कार्यरत आहेत. थोरात सोमवारी परिसरात गस्त घालत होते.
त्यावेळी मशीद बंदर येथे वाय. एम. रोडवरील झकेरिया मशिदीसमोर दोन व्यक्तींची मारामारी सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. थोरात तात्काळ तेथे गेले व त्यांनी भांडण सोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी शफीन हनीफ जिवानीने (२६) थोरात यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात थोरात यांच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. थोरात यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी जिवानीला अटक करण्यात आली.
हेही वाचा : पुणे : औंधमध्ये पादचारी ज्येष्ठाचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू
जिवानी चिंचबंदर येथील रहिवासी आहे. जिवानीविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात चोरीचे तीन, तर पायधुनी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त (परिमडळ-२) यांच्या कार्यालयाने जिवानीला २७ एप्रिल, २०२२ पासून २६ एप्रिल, २०२३ पर्यंत एका वर्षासाठी मुंबईतून तडीपार केले होते. तडापारीच्या कारवाईचा कालावधी संपलेला नसतानाही आरोपी मुंबईत फिरत होता. त्यानंतर त्याने परिसरात येऊन मारहाण केली व पोलिसावर चाकूने हल्ला केला. आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.