नोकरीच्या काही आव्हानात्मक क्षेत्रांबाबत आपल्या मनात कायम कुतूहल असते. त्या क्षेत्रांत काम करणाऱ्यांबाबत विशेष आदर असतो आणि उत्सुकताही असते. असेच एक क्षेत्र म्हणजे विमान वाहतूक क्षेत्र आणि वैमाननिकाचे काम. एवढय़ा मोठय़ा विमानात शेकडो प्रवाशांना बसवून समोरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या आणि अगम्य भाषेत ऐकू येणाऱ्या खुणा, संदेशाबरहुकूम विमान चालवणे हे कौशल्याचे काम. सुरुवातीला पुरुषांच्या समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनेक स्त्रियादेखील धडाडीने काम करीत आहेत. देशातील सर्व विमान कंपन्यांकडे स्त्री वैमानिक कामाला आहेत. कॅप्टन आदिती परांजपे त्यापैकीच एक. ‘जेट एअरवेअज’मध्ये कमांडर असणाऱ्या आदिती प्रवासी वाहतूक करणारे बोइंग विमान सराईतपणे चालवतात. वैमानिक बनण्यासाठी कुठलीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसतानाही, एका मराठमोळ्या घरातील, मराठी माध्यमात शिकलेली आदिती वैमानिकबनली हे विशेष. वैमानिकाच्या आयुष्याविषयी सांगण्यासाठी आणि या क्षेत्रातील आव्हाने, संधी याविषयी चर्चा करण्यासाठी कॅप्टन आदिती सोमवारी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावर येणार आहेत.
विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या कामातून प्रेरणा घेण्यासाठी केसरी प्रस्तुत लोकसत्ता ‘व्हिवा लाउंज’मध्ये दर महिन्याला एका प्रेरणादायी स्त्री व्यक्तिमत्त्वाला बोलते केले जाते. या गप्पांमधून त्या कार्यरत असलेल्या क्षेत्राविषयी जाणून घेण्याचाही उद्देश असतो. या वेळच्या कार्यक्रमासाठी कॅप्टन आदिती परांजपे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून उपस्थितांना कॅप्टन आदिती यांच्याशी मुक्त संवाद साधता येईल.
वैमानिक बनण्यासाठी काय तयारी करावी लागते, शैक्षणिक पाश्र्वभूमी काय असावी, अंगात कुठले गुण-कौशल्य असावी लागतात, पायलट लायसन्स मिळणे किती सोपे-किती अवघड अशा प्रश्नाांची उत्तरे कॅप्टन आदिती यांच्याकडून मिळतीलच, शिवाय त्यांचे कॉकपिटमधील अनुभवही त्यांच्याकडून ऐकता येतील. या क्षेत्रातील करिअरच्या वाढत्या संधी आणि आव्हाने याविषयी माहिती मिळू शकेल.
* कधी – सोमवार १८ एप्रिल
* कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्कसमोर, दादर (प.)
* वेळ – सायंकाळी ४.४५ वाजता.