मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली, पण त्यांची पूर्तता कधी केली नाही. मुंबईतील प्रमुख रस्त्यांची कामे मर्जीतील कंत्राटदारांना दिली गेली. त्यातूनच दक्षिण मुंबईतील १६०० कोटी खर्चाच्या कामांचे कंत्राट रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे. घटनाबाह्य सरकारचा भाजपने पाठिंबा काढून घ्यावा, असा सल्ला युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.
हेही वाचा >>> घटनाबाह्य खोके सरकार घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, कारण…”, आदित्य ठाकरे यांची टीका
मुंबईतील स्ट्रीट फर्निचरचा मोठा घोटाळा आहे. काम सुरू होण्यापूर्वीच २२ कोटी रुपये दिले गेले आहेत. राज्यातील भ्रष्ट सरकार घालवल्याशिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी सांगितले. मुंबई पालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याची परंपरा गेली अनेक वर्षे आहे मात्र कालपर्यंत या कर्मचाऱ्यांना बोनस दिला गेला नव्हता. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नावर ट्वीट केल्यानंतर त्यांना सहा-सात तासांत बोनस दिला गेला. याच वेळी दक्षिण मुंबईतील कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णयही पालिका प्रशासनाने एका ट्वीटमुळे घेतला आहे. रद्द करण्यात आलेले काम कधी सुरू करणार, असा प्रश्न ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे. पूर्व उपनगरात ९२० कोटी खर्चाची रस्त्यांची कामे देण्यात आलेली आहेत. यात चिपळूणमध्ये कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या कंत्राटदाराचा समावेश आहे. चौकशी सुरू असलेल्या कंत्राटदाराला कामे कशी दिली जातात? मुंबईतील सर्व कंत्राटदार बोगस असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. कंत्राटदारांना मुंबई किंवा महाराष्ट्र लुटून देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला.