सकाळी सातच्या आसपासची वेळ. अचानक सरकारी गाड्यांचा मोठा ताफा वरळी, महालक्ष्मी परिसरामध्ये दाखल झाला. या गाड्यांपैकी एका गाडीत होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. तर अजित पवार बसलेल्या या गाडीचं स्टेअरिंग होतं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हाती.
शुक्रवारी (११ फेब्रुवारी २०२२ रोजी) सकाळी आदित्य ठाकरे यांच्यासह अजित पवार पहाणी दौऱ्यावर निघाल्याचं पहायला मिळालं. वरळी, महालक्ष्मी परिसरातील विकासकामांची पाहणी करताना अजित पवार यांनी या भागांमधील झोपडपट्ट्यांची रचना, येथील समस्या आणि एकंदरित परिसराची प्रत्यक्ष पहाणी केली. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या वाहनाचे सारथ्य आदित्य ठाकरे करत होते. आदित्य ठाकरेंनी गाडीचं सारथ्य करण्याचं विशेष कारण म्हणजे अजित पवार ज्या वरळी, महालक्ष्मी परिसराची पहाणी करण्यासाठी आलेले तो, आदित्य ठाकरेंचा त्यांचा मतदारसंघ आहे.
अजित पवार यांनी वरळी, महालक्ष्मी परिसरातील समस्यांबद्दलची माहिती अदित्य ठाकरेंकडून घेतली. नक्की येथील नागरी समस्या काय आहेत, त्या कशा सोडवता येतील याबद्दलची पहाणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री आज स्थानिक आमदार असणाऱ्या आदित्य ठाकरेंसोबत पहाणी दौऱ्यावर निघाले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य यांचे वडील म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे आणि अजित पवार अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र थेट अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य ठाकरे कुटुंबातील व्यक्ती करत असल्याची ही पहिलीच वेळ.