शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगावमधील सभेच्या पार्श्वभूमीवर “आम्ही दगडं मारून सभा बंद पाडणारे लोक आहोत”, अशी धमकी दिली. यानंतर पत्रकारांनी आमदार आदित्य ठाकरे यांना गुलाबराव पाटलांच्या धमकीविषयी प्रश्न केला. यावर आदित्य ठाकरेंनी केवळ दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (२३ एप्रिल) वरळीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
गुलाबराव पाटलांनी आम्ही दगडं मारून सभा बंद पाडणारे लोक आहोत असं म्हटलं. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. या गल्लीगुंडांना लोक घरी बसवतील ही मला खात्री आहे.”
सरकार कोसळणार असल्याच्या संजय राऊतांच्या दाव्याविषयी विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रासह देशभरात ५० खोके, एकदम ओके हे सर्वांना माहिती झालं आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यात फार वेळ वाया घालवायला नको. लोकांची कामं महत्त्वाची आहेत. देशात आणि राज्यात लोकशाही संपायला लागली आहे असं वाटत आहे.”
“सत्ताधारी केवळ राजकारण करत आहेत”
“बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढत आहे. सगळीकडे उष्णतेची लाट आली आहे. यावर सत्ताधाऱ्यांपैकी कुणीही बोलत नाही. ते केवळ राजकारण करत आहेत. आम्हाला या राजकारणात रस नाही. आम्ही लोकांची सेवा करायला राजकारणात आलो आहे. ते करत राहू,” असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
“अजित पवार मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हणाले. त्यांचे बॅनरही लागलेआहेत. मध्यंतरी त्यांची जोरदार चर्चा होती”, असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मी त्यावर काहीच बोलू शकत नाही.”
हेही वाचा : अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मला जर कुणी…”
“घोटाळेबाज गद्दारांना भाजपा महाराष्ट्रात पाठबळ का देत आहे?”
“माझा भाजपाला सवाल आहे की, अशा घोटाळेबाज गद्दारांना भाजपा महाराष्ट्रात पाठबळ का देत आहे? भाजपा इतर राज्यात प्रचार करते की, आम्ही भ्रष्टाचार करणार नाही. मग या महाराष्ट्रावर भाजपाचा इतका राग का? ज्यांनी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी घोटाळा केला त्या गद्दारांना का पाठिंबा दिला?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.