मुंबई : ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पाला दिलेल्या सवलती आणि राज्यात प्रकल्प उभारण्याबाबत सामंजस्य करार करण्याविषयी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवलेले व माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेले पत्र जाहीर करीत हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता हे त्यावरून सिद्ध होत असल्याचा दावा शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे स्पष्ट होते. यावर वस्तुस्थिती समोर यावी म्हणून जाहीर चर्चा करावी, असे आव्हान ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेदांतच्या प्रमुखांसह बैठक झाल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला गेल्याकडे लक्ष वेधत ती भेट प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी होती की गुजरातला स्थलांतरित करण्यासाठी होती, असा सूचक सवाल करत या भेटीची माहिती एकनाथ शिंदे यांना होती का, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. एमआयडीसीच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पाच्या प्रमुखांना लिहिलेले पत्र माहिती अधिकारांतर्गत मिळवल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रामध्ये ‘वेदांत – फॉक्सकॉन’ प्रकल्प राज्यात उभारण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार करण्यासाठी वेदांतचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांना बैठकीला येण्यासंदर्भात त्यात विनंती करण्यात आली होती. ५ सप्टेंबर २०२२ चे हे पत्र आहे. पत्रात सवलती, सुविधांचा उल्लेख आहे. पुढील प्रक्रिया करण्यासाठी मी आपणाला मुंबईला यावे, तुमच्या सोयीची तारीख निश्चित करण्यासाठी आमंत्रित करतो आहे. मी तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे, असा पत्रात उल्लेख. याचाच अर्थ ‘वेदांत-फॉक्सकॉन’चा प्रकल्प येणार होता हे स्पष्ट होते. जुलैच्या अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेदांतच्या अधिकाऱ्यांसह जाहीर बैठक झाली. पण २९ ऑगस्टला दुसरी बैठक झाली ती उपमुख्यमंत्र्यांची. ती वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी होती की गुजरातला हलविण्यासाठी होती, असा सूचक सवाल आदित्य यांनी केला. यावर नुसते खोटे आरोप करण्यापेक्षा जाहीर चर्चा करा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.
तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल पण वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबाबत, महात्मा फुलेंबाबत वादग्रस्त वक्तव्ये होऊन तुम्हाला चीड येत नाही का? आता त्यांना पदमुक्त का करत नाही. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे उद्योग सुरू असून उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायचे मनसुबे होत आहेत, असा गंभीर आरोप आदित्य यांनी भाजपवर केला.
नारायण राणे यांची टीका
भाजपशी विश्वासघात करत महाराष्ट्रात स्थापन केलेली सत्ता हातून गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सर्रासपणे जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा उद्योग सुरू केला आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. विरोधकांनी अलीकडे बेळगाव, राज्यातील उद्योग बाहेर जाण्याच्या विषयावरून राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. यातून विरोधकांचे सत्ता गेल्याचे वैफल्य दिसून येत आहे. हातात काहीच मुद्दे नसल्याने विरोधकांनी जनतेची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री होते. त्या वेळी आणि मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात सत्तेची सूत्रे अप्रत्यक्षरीत्या हाती असताना सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पवारांनी काय केले असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.