मुंबई: वरळीतून माझी अनामत रक्कम जप्त होईल असे तुम्हाला वाटत असेल तर मी तुमच्याविरोधात ठाण्यातील कोपरी – पाचपाखाडी या तुमच्या विधानसभा मतदरसंघात येऊन निवडणूक लढवेन’, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना रविवारी दिले.

शिवसेना ठाकरे गटाचा वरचष्मा असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानात रविवारी कार्यकर्त्यांचा ‘निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. वरळीतून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा, ही ताकद कुणाची? शिवसेनेची, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना झिंदाबाद आदी घोषणा देत आणि हातात भगवे झेंडे घेऊन सायंकाळी ५ वाजल्यापासून  मैदानात कार्यकर्ते जमले होते. काही दिवसांपूर्वी ‘मी राजीनामा देतो, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी’ असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते. या आव्हानाचा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी वरळीतील निर्धार मेळाव्यात केला.

या निर्धार मेळाव्यात दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही भाषणे झाली. यावेळी विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी, विधान परिषद आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर, मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे आणि स्नेहल आंबेकर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर आदी उपस्थित होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार शाब्दिक लढाई सुरू आहे. अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांने नवे वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने घेतलेल्या निर्धार मेळाव्याला मोटी गर्दी झाली होती.

Story img Loader