मुंबईः महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) नेत्यांमध्ये जोरदार शाब्दीक चकमकी उडत आहेत. ‘मी राजीनामा देतो, एकनाथ शिंदे यांनी माझ्यासमोर वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी’ असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते. परिणामी, दोन्ही बाजूंमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदे वरळी मतदारसंघात पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी वरळी कोळीवाडा, वरळी नाका परिसरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
विधानसभा निवडणुकीत वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांची वाट बिकट कशी होईल, याचे पूर्ण प्रयत्न विरोधकांकडून सुरू होते. विशेष करून शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरापासून शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपने सण-उत्सवाची संधी साधून वरळी विधानसभा मतदारसंघात निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा >>> मतदानासाठी कलाकारांचीही हजेरी; मोठ्या संख्येने तारांकितांचे मतदान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरळीमध्ये भव्य नागरी सत्कार करून आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले होते. त्याविरोधात आदित्य ठाकरे यांनी वारंवार त्यांच्या भाषणातून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. ‘मी राजीनामा देतो, एकनाथ शिंदे यांनी माझ्यासमोर वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी’ असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळीत जातीने लक्ष घातल असून मतदानाच्या दिवशीही एकनाथ शिंदे आदित्य यांचा बालेकिल्ला असलेल्या वरळी कोळीवाडा, वरळी नाका परिसराला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री स्वतः वरळीत दाखल झाल्याने शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.
हेही वाचा >>> Amit Thackeray: “आम्ही अमित ठाकरेंना मदत करतोय, कारण…”, माहीम विधानसभेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा महायुतीला हरताळ?
सर्व कार्यकर्ते सेल्फी, छायाचित्र काढण्यासाठी शिंदे यांच्या गाडी मागे धावत होते. मुख्यमंत्र्यांनी अचानक वरळीत भेट दिल्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. वाहतूक पोलीस, दादर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ वरळी कोळीवाडा परिसरात धाव घेतली आणि वाहतुकीचे नियोजन केले. मुख्यमंत्र्यांचा ताफा आल्यामुळे येथील वाहतूक काही काळ थांबवावी लागली होती. वरळी मतदारसंघाला भेट देऊन एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना एक प्रकारे आव्हान दिल्याची चर्चा रंगली होती.