मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतू जोडणाऱ्या पुलाचे रविवारी प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा प्रकल्प सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. मात्र त्याआधीच या प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकीय श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार असते, तर हा प्रकल्प केव्हाच पूर्ण झाला असता’, असा दावा वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सागरी किनारा प्रकल्प वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार आहे. या पुलावरून सोमवार, २७ जानेवारीपासून दक्षिण मुंबईतून थेट वांद्रेपर्यंत दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे. त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावरून ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पणही यावेळी करण्यात येणार आहे. मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
दरम्यान, लोकार्पण कार्यक्रमापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. सागरी किनारा प्रकल्प हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्प आहे. २०१२ च्या पालिका निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पाच्या परवानग्यांसाठी २०१४ मध्ये राज्य आणि केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आले होते. अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर प्रकल्पासाठी २०१८ मध्ये परवानग्या मिळाल्या व नंतर हे काम सुरू झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाने वेग घेतला होता. आम्ही या प्रकल्पासाठी सतत बैठका घेत होतो, प्रकल्पस्थळी जात होतो. महाविकास आघाडीचे सरकार असते तर हा प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्येच पूर्ण झाला असता. तसेच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील हिरवळीची कामेही एव्हाना झाली असती असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
केवळ सागरी किनारा मार्ग पूर्ण करून सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, अशीही प्रतिक्रिया ठाकरे यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे. वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी बेस्टच्या गाड्यांचा ताफा वाढवणे, वरळी – शिवडी जोडमार्गाला वेग देणे, नरिमन पॉईंट, कफ परेड जोडमार्ग तयार करणे, उपनगरातील सागरी किनारा मार्ग ही कामे वेगात पूर्ण करावी, अशा अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
दुसऱ्यांदा होणार लोकार्पण
सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे उद्या दुसऱ्यांदा लोकार्पण होणार आहे. या प्रकल्पाच्या वरळी – मरीन ड्राईव्हपर्यंतच्या दक्षिण वाहिनीचे व बोगद्याचे लोकार्पण ११ मार्च २०२४ रोजी करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळीही ठाकरे आणि शिवसेना (शिंदे) व भाजप यांच्यात श्रेयावरून जोरदार आरोप – प्रत्यारोप झाले होते. लोकार्पण सोहळाही या आरोपांनीच गाजला होता. मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबईवर प्रेम करणारे प्रशासना हवे, मुंबईला देणारे सरकार हवे, मुंबईकडून केवळ घेणारे नको, मग ते श्रेय असले तरी, असाही टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.