शुक्रवारी सकाळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पहिली चाचणी पार पडली. मात्र, यावरून आता आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. या विमानतळाचे बांधकाम अजूनही सुरू आहे. मग अर्धवट बांधकाम असताना अशाप्रकारे स्टंटबाजी करायची काय गरज होती? असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना या चाचणीबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी सरकारला धारेवर धरलं. “बेकायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भारतीय हवाई दलाचे C-295 विमान नवी मुंबई विमानतळावर उतरवले. हे विमान कच्च्या आणि लहान धावपट्टीवरदेखील उतरू शकते. मुळात या विमानतळाचे बांधकाम सुरू आहे. अजूनही विमानतळ पूर्णपणे तयार नाही. यामुळे अशा स्टंटबाजीमुळे भारतीय हवाई दलाचा वेळ आणि करदात्यांच्या पैशाचा खर्च होत आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
हेही वाचा – “…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
“हवाई दलाची विमाने ही अशा कच्च्या रस्त्यांवरही उतरू शकतात. पण हे नागरी विमानतळ आहे आणि ते टर्मिनलसह प्रवासी वाहतुकीसाठी तयार झाल्यानंतरच; पूर्णपणे तयार आहे, असे मानले जाईल. त्यामुळे आजचा हा स्टंट करण्याची गरजच काय होती?” अशा प्रश्नही त्यांनी राज्य सरकारला विचारला.
पुढे बोलताना, “या विमानतळाला आतापर्यंत दि.बा.पाटील यांचे नाव द्यायला हवं होतं. २०२२ मध्ये आमचं सरकार असताना मंत्रिमंडळाने हा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, तरीही केंद्र सरकारने नवी मुंबई विमानतळाला अधिकृतपणे दि.बा.पाटील यांचे नाव दिलेलं नाही. राज्य सरकार त्यांच्या मित्रांसाठी कधीही मंत्रिमंडळाच्या बैठका घेतात, पण महाराष्ट्राच्या फायद्यासाठी घेत नाहीत”, अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
दरम्यान, राज्य सरकारने नुकताच काही महामंडळांना मंजुरी दिली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं. “विधानसभा निवडणुकीत पराभव होणार म्हणून आता महामंडळ आणि विविध निर्णय घेतले जात आहेत. मागच्या दोन वर्षात या सरकारने हे निर्णय का घेतले नाही?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“ओरिजनल ते ओरिजनल, थर्ड कॉपी बाजारात मिळतात”
शिवसेनेच्या ( एकनाथ शिंदे ) दसरा मेळाव्याच्या टिझर वरूनही आदित्य ठाकरे यांनी टीका केली. “हे मिंधेंच्या घरातले हे संस्कार आहेत. हिम्मत असेल तर शिंदेनी स्वतः चा चेहरा घेऊन निवडणूक लढवावी. बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा काढून टाकावा, धनुष्यबाण चिन्ह घेऊ नये आणि शिवसेनेचं नाव लावू नये. शेवटी ओरिजनल ते ओरिजनल असतं. अशा थर्ड कॉपी बाजारात मिळतात. ते लोक विचारांचा मेळावा म्हणतात, पण ते कुठे महाराष्ट्राचा विचार करतात? ते तर गुजरातचा विचार करतात?” असं आदित्य ठाकरे म्हणाले.