राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या कारवाईवरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “केवळ…”
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
न्यायालयाच्या निर्णय आल्यानंतर तातडीने अशा प्रकारची कारवाई करणं हे धक्कादायक आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे, हे आम्ही सतत सांगत आलो आहे. आजच्या कारवाईवरून ते स्पष्ट झालं आहे. ज्यांच्या मनात भीती असते, तिच लोकं अशाप्रकारे कारवाई करतात. आज झालेली कारवाई केवळ राहुल गांधीपुरती मर्यादित नाही, तर देशातील लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आज देशात सत्य बोलण्यावर बंदी आली आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच देशात आज लोकशाही संपवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे आणि देशासाठी ही धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधींवरील कारवाईवरून मोदी सरकारवर टीकास्र सोडलं. “राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर, देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू”, असे ते म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथे आयोजित रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?” असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भाजपाचे माजी आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेतला होता. तसेच त्यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, याप्रकरणी काल राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संदस्यत्व रद्द करण्यात आलं.