निर्भया पथकासाठी नियोजित निधीतून खरेदी करण्यात आलेली वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच आरे मेट्रो कारशेड आणि सीमावादाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर टीकास्र सोडले. रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघातील बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“निर्भया निधीतून घेतलेली वाहने गद्दारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत आहेत. ही लाजीरवाणी बाब आहे. राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. दुसरीकडे महिला अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या निर्भया पथकाची वाहने आता गद्दारांच्या सुरक्षेसाठी कशी वापरले जात आहेत? यावर सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
“राज्यातील सरकार घटनाबाह्य”
“आज ज्या आरेच्या जंगलात आपण उभे आहोत. हे जंगल वाचवण्यासाठी आम्ही आवाज उठवला होता. आरेचं जंगल न कापता मेट्रो ही कांजूरमार्ग आणि पहाडी गोरेगाव येथे करता आली असती. पण मुंबईवर राग काढण्याच्या हेतूने हे सरकार काम करत आहे. आज एमएमआरसीएलच्या प्लॉटमध्ये तीन बिबटे आढळले आहेत. याचा आर्थ आरे हे जंगल आहे. इथे आदिवासी पाडे, विविध प्रकारचे पशुपक्षी, झाडांच्या वेगळ्या जाती इथे आहेत. मुंबई हे जगात एकमेव शहर असेल जिथे जंगल आहे. मात्र, आम्ही जेव्हा या विषयावर बोलत होतो, तेव्हा राजकारण करण्यात आले. केंद्रानेही यात हस्तक्षेप केला. यात राजकारण करून घटनाबाह्य सरकार काम करते आहे”, असेही ते म्हणाले.
सीमावादाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका
“राज्याचे घटनाबाह्य सरकार सीमावादावर बोलायला तयार नाही. ते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. दोन्ही राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. आपल्याच देशात दोन राज्यात वाद सुरू आहेत. ही दुर्देवाची बाब आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री दादागिरीची भाषा करत आहेत. मात्र, आपले सरकार काहीच करायला तयार नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.
“आमचे मन मोठं आहे”
दरम्यान, आज झालेल्या समृद्धी महामार्गाच्या लोकापर्णाला आमंत्रण न मिळण्यावरूनही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्हाला समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचे आमंत्रण नसलं तरी आमचे मन मोठं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच हे सध्याचे राजकारण आहे. आज मी या विषयावर जास्त बोलणार नाही. पण यापूर्वी खरं उद्घाटन कधी होणार होतं याबाबत मी बोललो आहे”, असंही ते म्हणाले.