Aditya Thackeray : राज्यातलं सरकार लवकरच बंद पडणार आहे. येत्या निवडणुकीत या सरकारला पाडायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे. हे सरकार महाराष्ट्रातून नाही, तर गुजरातमधून चालत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावरूनही त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. आज मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“उपमुख्यमंत्री राज्यात त्रिमुर्तींचं सरकार असल्याचे म्हणत आहेत. पण राज्यातलं हे घटनाबाह्य आहे. हे सरकार लवकरच बंद पडणार आहे. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन आधीच बंद पडलेलं आहे. येत्या निवडणुकीत या सरकारला पाडायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे. हे सरकार महाराष्ट्रातून नाही, तर गुजरातमधून चालत आहेत. अशा या सरकारला महाराष्ट्रात स्थान नाही”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
मुंबईतल्या पाणीप्रश्नावरून मुख्यमंत्र्यांवर टीका
पुढे बोलताना त्यांनी मुंबईतल्या पाणीप्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्र सोडलं. “आज सकाळपासून मुंबईत विविध भागात गढूळ पाणी येत आहे. तसेच पाण्याचा दाबही कमी आहे. याबाबत लोक सोशल मीडियावर त्यांचा संताप व्यक्त करत आहेत. हे सगळं का होतं आहे, याबाबत महापालिका उत्तर द्यायला तयार नाही. महापालिका सध्या प्रशासन चालवत आहेत. मागच्या २५ वर्षात जेव्हा लोकप्रतिनिधी होते, तेव्हा असं कधीही घडलं नाही. ते आता घडायला लागलं आहे. त्यामुळे याची कारणं काय आहेत? याचं उत्तर आता थेट घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनीच द्यावं, कारण नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची चर्चा, आदित्य ठाकरे म्हणाले…
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून लाडकी बहीण योजनेच्या निधीवाटपामुळे असा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबतही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्र्यांना बहीण लाडकी आहे का हा प्रश्न आहे. लाडका बहीण किंवा लाडका भाऊ यांच्यासाठी नाही, तर लाडका कंत्राटदारांसाठी हे सगळं सुरू आहे. काल परवा एक बातमी आली होती. त्यानुसार मुंबई महापालिका बेस्टला आर्थिक मदत देण्यास नकार देत आहेत. मात्र, दुसरीकडे पैशांची उधळपट्टी सुरू आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Aditya Thackeray : “पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला”, आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर खोचक टीका
रवी राणांच्या विधानावरून राज्य सरकारला केलं लक्ष्य
यावेळी बोलताना रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावरूनही त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. “लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातींवर जेवढा खर्च केला जातो आहे, तो निधी जर रद्द केला, तर महिलांना वाढीव निधी दिला जाऊ शकतो. आमचं सरकार आल्यानंतर तो निधी आम्ही वाढवून देऊ. पण अशाप्रकारे विधानं आल्यानंतर त्यांच्या मनात किती विष आहे, हे दिसून येतं. अशा धमक्या महिला खपवून घेणार नाहीत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
© IE Online Media Services (P) Ltd