गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आज मुंबई दौऱ्यावर आहेत. व्हायब्रेंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ च्या रोड शोचं ते मुंबईत नेतृत्त्व करणार आहेत. यावरून राज्यातील विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना गुजराला नेण्यासाठी, गुजरातमध्ये आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या कार्यक्रमाला हजर असणार आहेत, यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका होऊ लागली आहे. तर, आता युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही टिकास्र डागलं आहे.
“गुजरातचे मुख्यमंत्री आज मुंबईत आहेत. ‘व्हायब्रंट गुजरात’ रोड शो साठी. गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत ह्यासाठी हा खटाटोप. पण त्यांना एवढी मेहनत करायची गरजच काय? फक्त एक फोन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना केला असता, तर त्यांनी आनंदाने कोलांट्या उड्या मारत इकडचे उद्योग तिथे पाठवायच्या कार्यक्रमाला अधिक वेग दिला असता! वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एयरबस-टाटा, ४० गद्दार…. सगळंच तर पाठवलं तिथे… अजून काय पाहिजे?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी X च्या माध्यमातून विचारला आहे.
हेही वाचा >> “व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखं…”, ठाकरे गटाचा टोला
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम मात्र होऊ नाही शकला, कारण ह्या खोके सरकारचं मॅग्नेट स्वतःसाठी खोके खेचतंय आणि उद्योग-रोजगार तिथे पाठवतंय! गुजरातला पाठवतात रोजगार आणि मिंधे सरकार रोज गार!!!”, अशीही टीका त्यांनी केली.
संजय राऊतांनीही केली होती टीका
खासदार संजय राऊत म्हणाले, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जातात. हाच का तुमचा अंगार? याच्यावर तुम्ही उत्तर द्या. गुजरातसाठी मुंबईत व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम होतोय, मग महाराष्ट्रासाठी तुम्ही (एकनाथ शिंदे) गुजरातला जाताय का? अहमदाबादला, लखनौला किंवा दिल्लीला जाताय का? महाराष्ट्रासाठी कधी गेला आहात का? गुजरातसाठी जाताय, कारण तुमच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे. आम्ही आमच्या गळ्यात कोणाचे पट्टे बाधून घेतले नाहीत.