मुंबई: जानेवारी महिन्यात होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात या उद्योग व गुंतवणूकविषयक कार्यक्रमाला मुंबईतील उद्योजकांना आमंत्रित करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या रोड शोवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका केली आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी यासाठी मुंबईत येण्याची गरज काय होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक फोन केला असता तर त्यांनी आनंदाने राज्याच्या हक्काचे उद्योगधंदे गुजरातमध्ये पाठविले असते, अशी खोचक टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा >>> VIDEO: “कधीतरी सरकार बदलतं, आपले लोक आले की कार्यकर्त्यांवरील…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
आतापर्यंत वेदान्त फॉक्सकॉन, ब्लक ड्रग पार्क, टाटा एअरबस हे उद्योग गुजरातला पाठविण्यात आले आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. राज्यातील उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित करण्यासाठी या बैठका होत असून राज्याचे महत्त्व कमी केले जात आहे. व्हायब्रंट महाराष्ट्राचा आत्मा गुजरातला पाठविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये जानेवारी महिन्यात होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमाच्या आयोजनाचा एक भाग म्हणून पटेल व गुजरात आद्यौगिक विकास महामंडळाचे अधिकारी मुंबईत आले होते.