मागील काही दिवसांपासून मुंबईसह अन्य प्रमुख शहरांमधील हवेची हवा प्रचंड खराब झाली असल्याचे समोर आले आहे. यावरून शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे म्हणतात, “तीन महिन्यांपासून अधिक काळ, मुंबई आणि एमएमआरच्या हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब अशी बदलत आहे. सर्दी आणि आरोग्याच्या समस्या वाढत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. माझ्यासारखे अनेक नागरिक दर आठवड्याला यावर आवाज उठत आहेत, पण असंविधानिक राज्य सरकार गप्प आहे.”
याचबरोबर “खराब वायू गुणवत्ता निर्देशांक अनुभवणाऱ्या इतर अनेक राज्यांप्रमाणे, शाळा, कार्यालयांना आरोग्याबाबत कोणताही सल्ला दिला जात नाही, आणि धूळ कमी करण्याच्या उपाययोजनांशिवाय मोठ्याप्रमाणावर बांधकामे यासारखे प्रदूषणाचे स्त्रोत अनियंत्रिपणे सुरू आहेत. असे दिसत आहे की राज्यसरकार नागरिकांच्या समस्यांकडे डोळेझाक करत आहे.” असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा – Vanchit Bahujan Aaghadi: “माझी युती शिवसेनेबरोबर, मला इतरांचं…” प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले!
याशिवाय, “पर्यावरणमंत्री या नात्याने मी मुंबई, पुणे, सोलापूर आदींसाठी हवामान कृती आराखडा बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग होता. जी आता रखडली आहे असे दिसत आहे. आमचे MCCC, EV धोरण, MCAP, धूळ कमी करण्याच्या उपयांना दूर ठेवलेले दिसते. सरकारने बोलून वागलं पाहिजे, आता.” असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.
“वायू गुणवत्ता निर्देशांक हा उच्च जीवनमानाचा भाग आहे. तसंच व्यवसायवृद्धीसाठी अप्रत्यक्षपणे मदत करणारा हा भाग ठरतो. (ज्या कर्मचाऱ्यांनी उच्च राहणीमान निवडलं आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे.) दुर्दैवाने राजकारणाप्रमाणेच हे बेकायदेशीर राज्य सरकार आपल्या शहरातील प्रदूषणाबाबत OK आहे.” असा टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला आहे.