मुंबई : ‘आई माऊलीचा उदो उदो’ या कोळी गीतावर युवा सेना अध्यक्ष व आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ठेका धरला. कोंबड हौल म्हणून प्रसिद्ध असलेल्या होलिकोत्सवाला ठाकरे उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी होळीची मनोभावे पूजा केली. मुंबईचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी समाजात होळी आणि नारळी पौर्णिमा हे दोन सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात. वाईट प्रवृत्तीच्या दहनाचे प्रतीक म्हणून होळीकडे पाहिले जाते. साधारणतः देशभरात फाल्गुन पौर्णिमेला होलिकेचे दहन करण्याची प्रथा आहे.

कोळीवाड्यांमध्ये फाल्गुन पौर्णिमेला होलिकेचे दहन केले जाते, पण ही होळी गावाचे प्रमुख असतात त्या पाटील लोकांची होळी म्हणून ओळखली जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कोळी बांधवांची होळी असते, त्या उत्सवाला आदित्य ठाकरे बुधवारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोळीवाड्यातील विविध मंडळांना भेट देऊन येथील होळीची पूजा केली. यावेळी त्यांनी ‘मी हाय कोली’, ‘आई माऊलीचा उदो उदो’ या पारंपरिक कोळी गाण्यांवर नृत्य केले.

वरळी कोळीवाड्यात लाऊडस्पीकर वाजवण्यावर पोलिसांनी निर्बंध आणले होते. संध्याकाळपासून पोलीस स्पीकर बंद करण्यास सांगत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पोलिसांकडून आवाजाचे नियम पाळण्याबाबत मंडळांना सांगण्यात आले होते. वरळी कोळीवाड्यातील होलिकोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस मिळाली आहे. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.

भाजपचा खरा चेहरा समोर येतोय – आदित्य ठाकरे

होळी निमित्त मी गेल्या ५ वर्षांपासून येथे येतो आहे. चांगली परंपरा हे कोळी बांधव जपत आहेत, रात्रभर आता हा उत्सव साजरा केला जाईल. हिंदु सणांच्या वेळी साऊंड सिस्टम बंद करणे, पीओपी मूर्तींवर बंदी घालणे अशा हळूहळू एक एक समोर येणाऱ्या घटनांमधून भाजपचा खरा चेहरा समोर येतो आहे. मी दरवर्षी येथे येतो आणि हे लोक मला गाण्यांवर ठेका धरायला लावतात. यावेळी मी सराव करून आलोय, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

कोंबड हौल हा काय प्रकार ?

वरळी कोळीवाड्यात कोळी समाजाच्या होळीला कोंबड हौल (होळी) असे संबोधले जाते. फार पूर्वी होळीत कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा होती, पण काळानुसार ही प्रथा बंद करण्यात आली आहे. त्या ऐवजी पुरणपोळीचा अथवा करंजीचा (पुरण्या) नैवेद्य दाखवला जातो. पूर्वापार प्रमाणे आजही या होळीला कोंबड हौल असे संबोधले जाते. कोंबड होळीला मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये वेगळाच उत्साह असतो. होळी लावली जाते त्या परिसरात रांगोळ्या काढल्या जातात. पताके सजवले जातात. घरात गोडधोड केले जाते. होड्यांना सजावट केली जाते, त्यांची पूजा केली जाते. कोळी महिला व पुरुष पारंपरिक वेश परिधान करून, नटूनथटून वाजतगाजत होळी आणतात. तिची पूजा करतात. गुलाल उडवतात. नवस बोलला जातो. ऊस, नारळ, फळे, ओटी, गोड पदार्थ यांचा नैवेद्य नवविवाहित जोडपे होळीला दाखवतात. मग होळीचे दर्शन घेतले जाते. रात्रीच्या वेळी होलिकेचे दहन केले जाते.

Story img Loader