मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात आज आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. राज्यातील शिंदे सरकार केवळ कंत्राटदारांना फायदा व्हावा या एकमेव हेतून काम करते आहे, असे ते म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांची लोकायुक्तांबाबत चौकशी करावी, अशी मागणीही राज्यपालांकडे केल्याचं त्यांनी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“गेल्या सहा ते सात महिन्यात आम्ही मुंबई महापालिकेतील अनेक घोटाळे बाहेर काढले आहेत. याची माहिती आम्ही राज्यापालांना दिली आहे. मुंबई महापालिकेतील अंदाधुंद कारभार आणि राज्यातील कंत्राटदारांच्या सरकारमुळे हे घोटाळे होत आहेत. या आरोपांची लोकायुक्तामार्फत चौकशी करावी, अशी मागणी आम्ही राज्यापालांकडे केली आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
“काही दिवसांपूर्वीच आम्ही महापालिकेतील सहा हजार कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा उघडकीस आणला होता. यापैकी १० रस्त्यांची कामदेखील अद्याप सुरू झालेली नाहीत. गद्दार गॅंग सोडली तर सगळ्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र यावर अद्यापही कारवाई झालेली नाही”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Maharashtra Political Crisis: “जर आत्ता निकाल लागला नाही, तर पुन्हा…”, उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली भीती!
“रस्ते घोटाळ्याबरोबरच आम्ही खडी घोटाळा आणि स्ट्रीट फर्निचर घोटाळाही उघडकीस आणला होता. स्ट्रीट फर्निचर घोटाळातही १६० कोटींची कामं २६३ कोटी रुपयांना दिली गेली. एकंदरीतच मिंधे सरकार केवळ कंत्राटदारांना फायदा व्हावा या एकमेव हेतून काम करते आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.