Maharashtra Budget Session 2022 : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार याचे संकेत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मिळाले होते. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिवेशनासाठी विधानभवनाच्या आवारामध्ये घेतलेली एन्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरील व्यक्ती.
नक्की पाहा >> Video: “कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे…”; सावित्रिबाईंबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन टीका
उद्धव ठाकरे आज सकाळी अकराच्या सुमारास विधानभवनामध्ये अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या ताफ्यासहीत दाखल झाले तेव्हा सर्वांना ड्रायव्हिंग सीटवरील व्यक्ती पाहून आश्चर्य वाटलं. उद्धव ठाकरेंच्या गाडीचं सारथ्य त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करत होते. आदित्य ठाकरेंचे वडील म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री मागील सीटवर बसले होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानभवनाच्या आवारात दाखल झाल्यानंतर आदित्य यांना गाडी चालवताना पाहून उपस्थित प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकांनी ही झलक कॅमेरात टीपण्यासाठी एकच गर्दी केली. आदित्य यांची हीच एन्ट्री सध्या चर्चेचा विषय ठरतेय.
नक्की वाचा >> Maharashtra Session: ‘दाऊद के दलालो को… जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?…’; भाजपाची घोषणाबाजी
काही दिवसांपूर्वीच म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं. वरळी, महालक्ष्मी परिसरामध्ये विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत घेऊन गेलेले. आदित्य ठाकरेंनी गाडीचं सारथ्य करण्याचं विशेष कारण म्हणजे अजित पवार यांनी ज्या वरळी, महालक्ष्मी परिसराची पहाणी केली तेथील आमदार आदित्य ठाकरे आहेत.