मुंबई हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाह याला अटक करण्यात आली आहे. मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिहीर शाहने ७ जुलैच्या पहाटे BMW ही कार चालवत प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा या दोघांना धडक दिली. धडकेत प्रदीप नाखवा खाली पडले. तर कावेरी नाखवांना तो फरपटत घेऊन गेला. अपघात इतका भयंकर होता की कावेरी नाखवांचा यात मृत्यू झाला. यानंर मिहीर शाह फरार झाला होता. त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. आज आदित्य ठाकरेंनी नाखवा कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मिहीर शाह याला राक्षस म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारवर चालला हातोडा

ग्लोबल बारच्या बाहेरचं बांधकाम बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर या बार बाहेर असलेली शेड पाडण्यात आली. पालिकेने हे पाडकाम केलं. मिहीर शाह हा याच बारमध्ये आला होता. या बारमधून बाहेर पडला. त्याने नंतर बीएमडब्ल्यू कार चालवत एका महिलेला उडवलं. कावेरी नाखवा यांचा या घटनेत मृत्यू झाला. मुंबईतल्या जूहू भागात ग्लोबल बार आहे. या बारवर कारवाई करण्यात आली.

हे पण वाचा- “वरळी अपघात प्रकरणावर मराठी सिनेसृष्टी गप्प का?”; संजय राऊतांचा सवाल

४५ वर्षांच्या कावेरी नाखवा यांचा मृत्यू

वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाहला पोलिसांनी विरार येथून ९ जुलै रोजी सायंकाळी अटक केली. अपघात झाल्यानंतर त्याने पलायन केले होते. गेले तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, त्याचा फोन बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परंतु, गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर त्याची आई आणि दोन मोठ्या बहिणांनीही मुरबाड येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा यांच्या घरी आज आदित्य ठाकरे गेले होते. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी मिहीर शाहला राक्षस म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख या दोघांनी आज नाखवा कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं, त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “तुम्ही कुठेही बुलडोझर चालवा. मात्र मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? हे पाहणं गरजेचं आहे. नरकातून राक्षस आला तरीही अशी कृती करणार नाही, तितकी वाईट ही केस आहे. अनेक लोक सांगतील की नुकसान भरपाई वगैरे देतो. पण त्यांना एक रुपया नकोय. त्यांना मिहीर शाह याला शिक्षा झालेली बघायची आहे. धडक दिल्यानंतर मिहीर शाह जर थांबला असता तरीही कावेरी नाखवांचा जीव वाचला असता. नाखवा कुटुंब प्रचंड दुःखात आहे. इतकी भयंकर गोष्ट मुंबई, महाराष्ट्रात ही गोष्ट घडू शकते हे पाहूनच दुर्दैवी वाटतं. गुन्हेगार असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन तुम्ही त्याला तुरुंगात टाकू शकता पण असा राक्षस असेल तर काय करणार? मिहीर राजेश शाह राक्षसच आहे. इतकं भयानक हे कृत्य आहे. ६० तासांनंतर जी अटक झाली आहे. त्याला साठ तास का लपायला दिलं? गृहखातं का शांत आहे, गृहमंत्री का शांत आहेत? ” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray meets pradeep nakhwa said mihir shah is demon free him for five minutes scj