मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी मुंबईत ४०० किमी रस्त्यांच्या विकासकामांची घोषणा केली होती. मात्र, ही कामं अद्यापही सुरू झाली नसून या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रेती, खडी ज्या कंत्राटदाराकडून घेतले जात आहे, त्याने स्वतःचे नियम लादले असल्यामुळे ही कामं रखडली असून पावसाळ्याआधी ही कामं होतील का याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
“४०० किमीचे रस्त्यांचा विकास करण्याचं या सरकारने ठरवलं. पण ३१ मेपर्यंत किती टक्के काम पूर्ण होणार आहे, याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही. पाच कंपन्यांना पाच कंत्राट मिळाले, पण या पाच कंपन्या कोणत्या हे कोणालाच माहिती नाही. परंतु, कोणतेही लोकप्रतिनिधी पालिकेत नसताना पाच कंत्राट दिले जातात. पैसे वाढवून कंत्राट दिले गेले. यामुळे ४८ टक्के जास्त बिडिंग झालं आहे. १८ जानेवारीमध्ये घाईघाईत वर्क ऑर्डर दिली. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना संपला. आता एप्रिल सुरू झाला आहे. परंतु, कामं सुरू झाली नाहीत. या पाच कंपन्यांची कामं कुठेच दिसत नाहीतठ, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी पाच प्रश्न सरकारला विचारले. “प्रस्तावित असलेली कामं सुरू कधी होणार?, कामं सुरू झाली असतील तर कुठे सुरू झाली?, एक्स्कॉलशनचा क्लॉज टाकला आहे का?, एस्केलशनचा क्लॉज बीएमसीने त्यात टाकला आहे का?, वर्क ऑर्डर अॅट पार कि बिलिंग नियमानुसार आहे?, सबलेट्सचा क्लॉज मशिनीद्वारे आहे का?, सहा हजार ८० कोटींच्या टेंडरला १० टक्के मोबलायजेशन आहे, हे ६५० कोटी बिल्डर्सच्या घशात टाकण्याचा प्रयत्न आहे का?” असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंनी यावेळी पुन्हा उपस्थित केले.
“रस्त्यांची कामं ३१ मेपर्यंत प्रगतीपथावर असणं गरजेचं आहे. परंतु, कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. यासंदर्भात भाजपाच्या माजी नगरसेवकाचं पत्रही पालिकेला आले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ माजी नगरसेवक आहेत. त्यांनीच हे पत्र पालिकेला पाठवले असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांच्या वॉर्डात रस्त्यांची कामं सुरू झाली नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. कोणत्याच माजी नगरसेवकाच्या वॉर्डात कामं सुरू झाली नसल्याचंही आदित्य ठाकरे यांनी पुढे स्पष्ट केलं.
कंपन्यांना शो कॉज नोटीस
या कंपन्यांना शो कॉस नोटीस बजावण्यात येणार होती. परंतु, त्याआधी कंत्राटदार कंपन्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला कंपनीतील एकही वरिष्ठ अधिकारी आले नाहीत. त्यांच्या जागी कनिष्ठ वर्गातील अधिकाऱ्यांनी बैठकीला हजेरी लावली. त्यानुसार, या कंपन्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आली. परंतु, तरीही कंपन्यांनी कामे सुरू केलेली नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
रेती-खडी खरेदीत घोटाळा
रस्त्याची कामं सुरू असल्याचा भास केला जात आहे. परंतु, गेल्या दोन आठवड्यांपासून ही कामं बंद आहेत. क्वोरी आणि क्रशर्सना एमपीसीबीकडून नोटीसा मारल्या आहेत. त्यामुळे कामं बंद आहेत. एका कंपनीला रेती, खडीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. याच कंपनीकडून सर्व कंत्राटदारांनी रेती आणि खडी विकत घ्यायची आहे. परंतु, ही कंपनी अव्वासव्वाच्या दराने रेती आणि खडी विकत आहे. त्यामुळे ही कामं रखडली आहेत.
जी खडी ३०० पर टन मिळत होती, ४०० ते ६०० पर टन मिळतेय. हा वेगळा टॅक्स आहे. स्वतःचं स्वराज्य असावं असा वेगळा टॅक्स लावला आहे का? या मनमानी कारभारावर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अन्यथा पावसळ्यात मुंबईकरांना खूप काही सहन करावं लागणार आहे. कामं उशीराने सुरू झाल्यास कामांचा प्रस्तावित खर्च वाढण्याची शक्यता आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये थोडीतरी लाज असेल तर या कंत्राटासंदर्भात चर्चा झाली पाहिजे, असंही आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या खात्यातच घोटाळा
जिथे जिथे घोळ होतोय ती खाती शिंदेंकडेच आहे. पर्यावरण खातं मुख्यमंत्र्यांकडे, नगरविकास खातंही त्यांच्याकडेच आहे. म्हणून ठामपणे भूमिका मांडतोय की हळू आवाजात विषय पोहोचला आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणती कामं सुरू आहेत, ठप्प झाले आहेत, खड्यांचा घोळ काय आहे? रेती-खडीचं कंत्राट ठराविक कंपनीलाच द्या ही डिमांड काय आहे? असेही प्रश्न आदित्य ठाकरेंनी मांडले.