बच्चू कडू-रवी राणा वादावर बोलताना उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘बच्चू कडू हे माझ्या एका फोनकॉलवर गुवाहाटीला गेले होते’, असं मोठं विधान केलं होतं. या विधानावरून शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विधान बोलकं असून याचा गंभीर विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Vedanta Foxcon: फडणवीसांकडून महाराष्ट्राची दिशाभूल, केंद्राकडे बोट दाखवून अपयश झाकण्याचा प्रयत्न – आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“बच्चू कडू कडू पैसे घेऊन गुवाहाटीला गेले नसून ते माझ्या एका फोनकॉलवर गुवाहाटीला गेले होते, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. मात्र, त्यापुढे जाऊन त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं, ‘इतरांनी घेतलं का हे मला माहिती नाही’, असं ते म्हणाले. ही खूप बोलकी वाक्य आहेत. याचा आपण सर्वांनीच गंभीरपणे विचार करायला हवा”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा – तीन लाख कोटींचा ‘नाणार’ प्रकल्प महाराष्ट्रात होणार की नाही? केरळचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले “प्रकल्प पूर्णपणे…”

“बच्चू कडू आणि रवी राणा यांनी आरोप मागे घेतले असले, तरी हे आरोप खूप गंभीर आहेत. लग्नात गेल्यानंतर ‘खोकेवाला आला’, असं लोकं म्हणत असल्याचे स्वत: बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी व्हायला हवी”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – बच्चू कडू-रवी राणा वादावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान म्हणाले, “माझ्या एका कॉलवर…”

नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?

“बच्चू कडू हे माझ्या एका फोनकॉलवर गुवाहाटीला गेले होते. मी त्यांना फोन करून सांगितलं होतं, की आम्हाला सरकार बनवायचे आहे आणि तुमची साथ हवी आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी कोणता आर्थिक व्यवहार केला, हे म्हणणं चुकीचं आहे. इतरांचं मला माहिती नाही. मात्र, बच्चू कडूंवर अशा प्रकारचे आरोप लावणं चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे जी लोक गुवाहाटीला गेली, ती पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन गेली”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray reaction on devendra fadnavis statement regarding bacchu kadu guwahati call spb