शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाल्यानंतर या वादावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी चार ओळीत ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सत्यमेव जयते, आपला दसरा हा शिवतीर्थावरच, विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय, सन्माननीय उच्च न्यायालयाचे आभार”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.
हेही वाचा – Dussehra Melava: उद्धव ठाकरे उभे राहतील तेव्हाच एकनाथ शिंदेही भाषण करणार? शिंदे गट म्हणतो “भाषणाची वेळ…”
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सरवणकरांची याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला. पालिकेचा निर्णय नाकारण्याचा निर्णय वास्तविकतेला धरून नाही, असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवलं. दादर पोलिसांचं संख्याबळ पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं.