मुंबई : दिशा सालियन मृत्युप्रकरणी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांमुळे बदनामीबद्दल न्यायालयात जाण्याचा विचार शिवसेना नेते आदित्य ठाकरे करीत आहेत. याप्रकरणी त्यांना तुरुंगात पाठविण्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सालियनप्रकरणी तपास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी पथक स्थापन करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन मृत्युप्रकरणी आरोप केले आहेत. त्यांच्या ‘नार्को’ चाचणीची मागणी केली आहे. शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीला ‘एयू’ नावाने आलेले अनेक दूरध्वनी आदित्य ठाकरे यांचे होते, असे आरोप केले आहेत.

ठाकरे गटातील नेत्यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले असले तरी अब्रुनुकसानीबद्दल न्यायालयात दावा दाखल करता येईल का किंवा ‘एसआयटी’ चौकशीसह अन्य मुद्दय़ांवर न्यायालयात जाता येईल का, याबाबत आदित्य ठाकरे कायदेशीर सल्ला घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरे गटही आक्रमक झाला असून मुख्यमंत्री व राज्य सरकार विरोधात नागपूरमध्ये सोमवारी मोठा गौप्यस्फोट करण्याचे प्रत्युत्तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्याप्रकरणी त्यांच्या ‘डायरी’तील सांकेतिक नावांची चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray ready go to court accusations in the disha salian case ysh