Aditya Thackeray : आज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरेंनी दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. तसंच आम्हीही देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करु असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
ज्या गृहनिर्माण संस्था असतात त्यात निवृत्त पोलिसांना १५० रुपये प्रति चौरस फूट दंड शुल्क लावण्यात आलं आहे. हा खर्च निवृत्त पोलिसांना परवड नाही. त्यामुळे हे शुल्क २० रुपये प्रति चौरस फुटांवर आणावं. हे दंड शुल्क कुणालाही परवडत नाही. दोन ते तीन पिढ्यांपासून मुंबईची सेवा करणारे लोक तिथे राहतात, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली. दुसरी मागणी ही केली की आधीही मागच्या सरकारमध्ये आश्वासन देण्यात आलं होतं की निवृत्त पोलिसांना मुंबईत घरं दिली जावीत. अद्याप ती घरं देण्यात आलेली नाहीत. नवी मुंबईचा पर्याय नको, मुंबईतच घरं कशी मिळतील? हे सरकारने पहावं अशी मागणी आम्ही केली आहे. कुर्ला, मरोळ, सांताक्रूझ या भागांमध्ये पोलीस वसाहतींमधल्या इमारती यांची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. त्यामुळे तिथे नव्या इमारती बांधण्यात याव्यात. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणीही केली. असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
सर्वांसाठी पाणी ही योजना पुन्हा आणावी
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती. कुठल्याही वसाहतींचं लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देण्यात यावं ही योजना आणली होती. मात्र घटनाबाह्य सरकारने ती योजना स्थगित केली होती. ही योजना पुन्हा सुरु करा अशीही मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. नव्या सरकारमध्ये जनहिताची कामं विरोधी पक्ष आणि सरकार एकत्र मिळून करु शकेल असं आश्वासनही आम्हाला मिळालं आहे. एका चांगल्या हेतूने आम्ही इथे आलो आहोत. तसंच सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईत लगेच सुरु करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा-आदित्य ठाकरे
टोरोसचा जो घोटाळा झाला त्याबद्दलही आम्ही चर्चा केली. तसंच मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार आहेत. त्या दौऱ्यानंतर आम्हाला बैठकीसाठी वेळ देण्यात आली आहे. आधीच्या सरकारने दावोसला जाऊन उधळपट्टी केली होती. या दौऱ्यात तशी होऊ नये अशीच आमची अपेक्षा आहे असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सर्वांसाठी पाणी या योजनेसाठी मुख्यमंत्री सकारात्मक होते. पोलीस वसाहतींबाबतही समिती नेमण्यात आली आहे असं सांगण्यात आलं.
…तर आम्हीही देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करु-आदित्य ठाकरे
ईव्हीएमचं सरकार की जनतेचं सरकार आहे हा संशय अद्याप आहेच. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तसंच आम्ही विरोधी पक्ष म्हणून जर विषय मांडत असू तर काहीही चुकीचं नाही. आमचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांच्या भेटी होत होत्या. आमचं एकत्र सरकार असतानाही आम्ही भेटत होतो. जनहिताच्या कामासाठी ज्या भेटीगाठी होतात त्यात गैर काय? असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न विचारला असतात ज्या दोन मागण्या आम्ही केल्या त्या पूर्ण केल्या तर आम्हीही देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करु असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.