मुंबई : राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या २८ तासांच्या डाव्होस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाला असून या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नेमके काय केले, याचा तपशील जाहीर करण्याची मागणी शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केली. शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी डाव्होस दौऱ्यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
राज्यात गुंतवणुकीसाठी डाव्होसमध्ये सर्वाधिक करार; उदय सामंत यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
चार दिवसांच्या डाव्होस दौऱ्यात साधारणत: ३५ ते ४० कोटी रुपये अंदाजित खर्च झाला. म्हणजेच दिवसाला साडेसात ते दहा कोटी खर्च झाला. यामध्ये आणखी नवीन खर्च वाढू शकतो, या दौऱ्यात त्यांच्यासोबत अधिकृत कोण होते, मित्रपरिवार सोबत गेला होता का, ते कुठे राहिले, त्यांचा खर्च कोणी केला, त्यांच्या गाडय़ांचा खर्च कोणी केला, हे सगळे लोकांसमोर यायला हवे अशी मागणी ठाकरे यांनी केली. डाव्होसला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. यावर दोन ते अडीच कोटी खर्च झाला असेल. कमर्शिअल विमानाऐवजी चार्टर्ड विमानाचा वापर लवकर पोहोचण्यासाठी करता. पण एकनाथ शिंदे उशिरा पोहोचले. यामुळे सकाळी साडेसात वाजता होणारे उद्घाटन सायंकाळी साडेसातला झाले व गुंतवणुकीसाठीच्या अनेक बैठका रद्द झाल्या, असा दावाही ठाकरे यांनी केला. बैठकांचे फोटो किंवा पुरावे कुठेही दिसले नाहीत. डाव्होसमध्ये एकूण झालेल्या करारांपैकी ३५ ते ४० कोटींचे जे करार झाले त्या तीन कंपन्या तर महाराष्ट्रातीलच होत्या असा दावा त्यांनी केला.