Aditya Thackeray on Narendra Modi Thane Visit : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांची आज (३ ऑक्टोबर) मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून मुंबई-ठाण्यात पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणाऱ्या रस्ते, बोगद्याच्या भूमिपूजन सोहळ्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. प्रकल्पांना अद्याप पूर्ण परवानग्या नसताना, कोणतीही प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना शासनाकडून भूमिपूजनाचा घाट घातला जातोय. पंतप्रधान मोदी यांचं स्वागत, पण एकदा भूमिपूजन करण्याआधी प्रकल्पाची माहिती घ्यावी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ५ ऑक्टोबर रोजी ठाण्यात गायमुख भाईंदर रस्ता, बोगदा आणि इतर कामांचं भूमिपूजन पार पडणार आहे, दरम्यान या प्रकल्पांसाठी निविदा काढणे, परवानग्या मिळणे आणि इतर अनेक बाबी अपूर्ण असताना भूमिपूजनाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला जाब विचारत इशारा दिला आहे.
हे ही वाचा >> २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटामागे सिमीचा हात, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा विशेष न्यायालयात दावा
कंत्राटदार नेमला नाही, परवानगी मिळाल्या नाहीत, तरीही भूमिपूजन करणार?
पंतप्रधानांच्या हस्ते गायमुख भाईदर रस्ता प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे, त्यासाठी १४ हजार कोटींची निविदा खाडण्यात आली आहे. शॉर्ट टेंडर नोटीसमध्ये २० दिवसात टेंडर काढलं असून त्याचं भूमिपूजन होईल. मुख्यमंत्री मोदींना ठाण्यात घेऊन जात आहेत. परंतु, पंतप्रधान कार्यालयाने माहिती घ्यावी, या रस्त्यासाठी कंत्राटदार नेमलेला नाही. सगळ्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. तरीसुद्धा तुम्ही भूमिपूजन करणार का? मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखायला हवी, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली.
हे ही वाचा >> बदलापूर चकमक प्रकरण : शिंदेला लागलेली गोळी कशी सापडली नाही ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना प्रश्न
आमचं सरकार आल्यावर चौकशीला समोर जावं लागेल; आदित्य ठाकरेंचा इशारा
आदित्य ठाकरे यांनी सरकारला अपुऱ्या प्रकल्पावरून धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे म्हणाले ‘मुबंईतील सिमेंट काँक्रिट रस्त्याचं कामं अद्याप अपूर्ण आहेत. मोदींनी २०१७ मध्ये शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं. त्याचं पुढे काय झालं? राम मंदिरसुद्धा अर्धवट आहे. त्याचंदेखील मोदींनी उद्घाटन केलं आहे. नव्या संसदेचं उद्घाटन केलंय मात्र ती संसदही अर्धवट आहे. आमचं सरकार आल्यावर तुम्हाला या सर्व अर्धवट कामांच्या उद्घाटनाप्रकरणी चौकशीला समोरं जावं लागेल. आम्ही महाराष्ट्राला लुटू देणार नाही. तसेच पंतप्रधान कार्यालयाने यां सगळ्याचा अभ्यास करायला हवा. ठाणे बोरिवली बोगद्याचं कामही अर्धवट आहे. नुसते भूमिपूजन करताय. तुम्हाला जर नुसतंच उद्घाटन करायचं असेल तर करा, त्याने खोटं काम समोर येईल.