मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी – वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत सध्याचा प्रभादेवी पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हा पूल मंगळवार, १५ एप्रिल रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून पुलाचे पाडकाम सुरू करण्यात येणार आहे.

त्यानंतर हा पूल तब्बल २० महिने बंद राहणार असल्याने प्रवासी, पादचारी, वाहनचाक सर्वांचीच गैरसोय होणार आहे. मोठा वळसा घालून वाहनचालकांना प्रवास करावा लागणार आहे. असे असताना आता शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रभादेवी पुलाचे पाडकाम पुढे ढकलावे अशी मागणी एका लेखी पत्राद्वारे एमएमआरडीएकडे केली आहे. ‘एक्स’ समाज माध्यमावर एक पोस्ट टाकून त्यांनी ही माहिती दिली.

म्हणून पुलाचे पाडकाम

अटल सेतूला जोडणारा शिवडी – वरळी उन्नत रस्ता सध्याच्या प्रभादेवी पुलावरून जाणार आहे. मात्र सुमारे १२५ वर्षे जुन्या प्रभादेवी पुलाची दूरवस्था झाल्याने तो पाडून नवीन पूल बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे एमएमआरडीए येथे नवीन पूल बांधणार आहे. एमएमआरडीएने या ठिकाणी द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या द्विस्तरीय पुलाचे बांधकाम करण्यासाठी, सध्याचा पूल पाडण्यासाठी एमएमआरडीएला मागील कित्येक महिन्यांपासून वाहतूक पोलिसांच्या परवानगीची प्रतीक्षेत होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. वाहतूक पोलिसांनी पुलाच्या पाडकामासह नवीन पूल बांधण्याच्या कामासाठी १५ एप्रिल २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत एमएमआरडीएला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

पूल आता २० महिने बंद राहणार असून जानेवारी २०२७ मध्ये नवीन पूल वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे २० महिने नागरिकांचे हाल होणार आहेत. वाहतूक पोलिसांनी २० महिन्यांसाठी वाहतुकीचे विविध पर्याय वाहनचालकांना – प्रवाशांना उपलब्ध केले आहेत. मात्र यासाठी मोठा वळसा घालून, वाहतूक कोंडीचा सामना करत प्रवास करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी प्रभादेवी पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मागणी

आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएला एक पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार प्रभादेवी पूल फेब्रुवारीत पाडला जाणार होता. मात्र ही बाब लक्षात घेऊन परीक्षा संपल्यानंतर पुलाचे पाडकाम करावे, अशी मागणी मी आपल्याकडे केली होती. त्याची दखल घेत आपण परीक्षा संपल्यानंतर पाडकाम करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी आभार. मात्र सध्या गणपत कदम मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच प्रभादेवी पुलाचे पाडकाम सुरू करणे योग्य होईल.

जेणेकरून वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होणार नाही. त्यामुळे प्रभादेवी पुलाचे पाडकाम काही काळासाठी पुढे ढकलावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. एमएमआरडीएकडून मात्र पुलाच्या पाडकामाची तयारी सुरू आहे. मुळातच या प्रकल्पाला बराच विलंब झाला आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर पूल पाडून नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.