महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून केलेल्या सभेतून आणि त्यानंतर ठाणे येथील उत्तर सभेमधून मशिदींवरील भोंग्यासंदर्भात राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवाय, यावरून मोठ्याप्रमाणावर आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आज राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना दोन मोठ्या घोषणा केल्या. ”५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे आणि महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे.” असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या या औरंगाबाद दौऱ्यावर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात टोला लगावला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत, असं सांगत यावर माध्यम प्रतिनिधींनी जेव्हा आदित्य ठाकरे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा आदित्य यांनी “तिथे आम्ही पर्यटन वाढवतोय.” अशी एका वाक्यात प्रतिक्रिया देत यावर टोला लगावला. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्येही हशा पिकला होता.
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा; ५ जूनला अयोध्येला जाणार
मुंबईत गिरगाव चौपाटी येथील व्ह्युविंग डेकच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना विविध मुद्य्यांवर प्रश्न विचारले, तेव्हा ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली.
…यामध्ये कुठेही राजकीय हेतू नाही –
आदित्य ठाकरे म्हणाले, “अयोध्येत जो संघर्ष होता तो न्यायालयाने संपवलेला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे अयोध्येत मंदिर बनत आहे. ज्यावेळी संघर्ष सुरू होता तेव्हा आम्ही गेलेलो, त्यावेळी आम्ही सांगितलं की पहिले मंदिर फिर सरकार, तसं ते काम सुरू झालं आणि आता आम्ही चाललो ते दर्शनासाठी चाललो, आमची स्वत:ची जिथं श्रद्धा आहे तिथे आम्ही चाललो आहोत. यामध्ये कुठेही राजकीय हेतू नाही. धर्म हा आपल्या मनात असतो. आपण मंदिरात जात असतो, काल मी देखील हनुमान चालीसा पठण केलं.”
तसेच, “निवडणुकीच्या वेळी आम्ही प्रचार करत असतो परंतु त्यानंतर मधला जो काळ असतो, त्यात कामं करायची असतात. जी कामं आम्ही करत असतो त्याची भूमिपुजनं, उद्घाटनं आम्ही हाती घेत असतो. मुंबईत पर्यटनासाठी आणि पर्यावरणासाठी विविध कामं आपण करत आहोत, त्या दृष्टीने आज आपण एक पाऊल पुढे टाकत आहोत.” असंही यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवलं.