सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदना’च्या उद्घाटनाची शासनाला आता घाई झाली आहे. मात्र बांधकाम पूर्ण होऊनही गेले काही महिने बंद असलेल्या महाराष्ट्र सदनाची पुन्हा रंगरंगोटी करण्यास वेळ लागणार असल्यामुळे शासनाने कितीही मनात आणले तरी आणखी तब्बल महिनाभर उद्घाटन समारंभ आयोजित करणे कठीण होणार आहे.
अंधेरी पश्चिमेतील प्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीच्या मोबदल्यात विकासकाकडून दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधून घेण्यात आले. या सदनाचा मूळ खर्च ५० कोटींवरून दीडशे कोटींवर गेल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. सदनासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष पुरातन वस्तूंचा आग्रह अचानक धरला गेल्यामुळे ही पाळी ओढवली होती. सार्वजनिक बांधकाम विभागात नियमबाह्यरित्या वावरणाऱ्यामुळे हा खर्च वाढला असला तरी तो कंत्राटदाराला करणे भाग होते. कंत्राटदाराने ती तयारीही दर्शविली होती. मात्र हा घोटाळा असल्याचा आरोप केला गेल्यामुळे हे प्रकरण राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागापर्यंत पोहोचले. या प्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर सदनाचे उद्घाटन लांबले.
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र त्यावेळी सदनाचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते. तरीही उद्घाटनाचा आग्रह धरला जात होता. गोतावळ्यातच देण्यात आलेले फर्निचरचे कामही घाईघाईने पूर्ण करण्यात आले. मात्र तरीही उद्घाटन होऊ शकले नव्हते. आता मात्र शासनाकडून पुन्हा घाई केली जात आहे. आताही दोन तारखा निश्चित झाल्या. मे. के. एस. चमणकर एन्टरप्राईझेसने ही वास्तू अशा पद्धतीने उभारली की त्यामुळे पर्यटकांचा ओघ सुरू झाला आणि अभ्यागतांच्या भेटीने सदन खराब करून टाकले आहे. सदनात शोभेसाठी ठेवलेल्या काही छायाचित्रांच्या फ्रेमच्या काचाही तुटलेल्या आहेत. सदनाची पुन्हा रंगरंगोटी करण्याची आवश्यकता असतानाही तारखा निश्चित केल्या जात आहेत. महाराष्ट्र सदनाचा उद्घाटन सोहळा दिमाखात करण्याऐवजी तो घाईघाईत करण्याचा घाट का घातला जात आहे, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा